४२ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या
नागपूर : पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी शहर पोलिस दलातील ४२ पोलिस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या. मंगळवारी बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. गत अनेक दिवसांपासून पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. या बदल्यांमुळे पोलिस उपनिरीक्षकांमध्ये 'कही खुशी कही गम',असे वातावरण आहे. बदल्या झालेल्या उपनिरीक्षकांमध्ये चर्चेत आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
.....
दीड लाखांचे मोबाइल लंपास
नागपूर : विक्री करून देण्याच्या बहाण्याने दोघांनी दीड लाख रुपये किमतीचे १३ मोबाइल लंपास केले. याप्रकरणी तहसील पोलिसांनी सागर राजकुमार मुलचंदानी व राम मोटवानी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पिवळी मारबत चौकात शुभम संजय गुप्ता (वय २६,रा.प्रभू लीला ले-आऊट) याची केजीएन मोबाइल शॉपी आहे. सागर व राम हे दोघे मोबाइलमध्ये लागणारे साहित्याची विक्री करतात.त्यामुळे त्यांची शुभमसोबत ओळख होती. १३ मोबाइल विक्री करून देण्याचे आमिष दोघांनी शुभम याला दाखविले. त्याच्याकडून मोबाइल घेऊन पसार झाले.
....
गांधीसागरमध्ये मृतदेह
नागपूर : गांधीसागरमध्ये ४५ वर्षीय मोहम्मद अल्लाउद्दीन अन्सारी रा.मोमीमनपुरा यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अन्य एका घटनेत सुयोगनगरमधील नाल्यात ४० वर्षीय अनोळख इसमाचा मृतदेह आढळला.