अ‍ॅपशहर

गोंडवाना विद्यापीठात शिकविणार जादूटोणाविरोधी कायदा

राज्य सरकारने लागू केलेला जादूटोणाविरोधी कायदा आता गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकविला जाणार आहे याबाबतचा ठराव अधिसभेने नुकताच घेतला आहे...

Maharashtra Times 19 Nov 2018, 4:00 am

म.टा. वृत्तसेवा, गडचिरोली : राज्य सरकारने लागू केलेला जादूटोणाविरोधी कायदा आता गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकविला जाणार आहे. याबाबतचा ठराव अधिसभेने नुकताच घेतला आहे.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत सातत्याने पुढाकार घेऊन या कायद्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेत सिनेट सदस्य अॅड. गोविंद भेंडारकर यांनी हा कायदा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी लावून धरली होती. अधिसभेने हा सकारात्मक निर्णय घेऊन हा कायदा विद्यापीठात शिकवला जाईल, असे आश्वस्त केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटची सभा गडचिरोली येथे नुकतीच झाली. सदर सभेत विद्यापीठाच्या विधीशास्त्र व समाजशास्त्र विभागात जादूटोणाविरोधी कायदा२०१३ चा समावेश अभ्यासक्रमात करण्यात यावा, असा ठराव सभागृहात अॅड. गोविंद भेंडारकर यांनी मांडला. तो सभागृहाने सर्वानुमते मंजूर केला व विद्वत्त परिषदेकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव मोहुर्ले यांच्याशी संपर्क साधला असता, विद्वत्त परिषदेने यासंदर्भात मान्यता दिल्यानंतर पुढील प्रकिया सुरु होईल, अशी माहिती त्यानी 'मटा'शी बोलताना दिली. या प्रकियेनंतर अभ्यास मंडळाकडे विषय जाईल. त्यानंतर यासंदर्भात अभ्यासक्रम सुरु करण्याची तयारी होईल, या संपूर्ण प्रक्रियेत वेळ लागणार असून पुढच्या शैक्षणिक वर्षात जादूटोणाविरोधी कायदा शिकवायला येण्याची शक्यता आहे. सर्व सिनेट सदस्य व कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचे अॅड. गोविंद भेंडारकर यांनी आभार मानले.

---------------

कोट

चंद्रपूर व गडचिरोली हे आदिवासीबहुल जिल्हे आहे. या भागात नरबळीच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. राज्य सरकारने जादूटोणाविरोधी कायदा केल्यानंतर या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मी अंनिसचा पदाधिकारी असल्याने विद्यापीठात या कायद्याचा अभ्यास झाला पाहिजे यासाठी हा ठराव मांडला. अधिसभेने तो सर्वानुमते मंजूर केला. कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर हे पुरोगामी विचारसरणीचे आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून हा कायदा लोकाभिमुख करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

- अॅड. गोविंद भेंडारकर, सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.

------------------

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज