अ‍ॅपशहर

सावधान, दुधाचा दर्जा घसरला

नागपूर : दूध हे पूर्णान्न मानले जाते. मात्र, आता या दुधाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपुरातील २७ दूध विक्रेत्यांकडून कमी दर्जाच्या दुधाची विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेल्या तपासणीतच ही बाब पुढे आली असून, फसवणूक करणाऱ्या दूधविक्रेत्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे.

Maharashtra Times 20 Aug 2018, 12:17 pm
'एफडीए'कडून डेअरी मालकांना दंड; बड्या उत्पादक-विक्रेत्यांकडून फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम be careful the quality of the milk dropped
सावधान, दुधाचा दर्जा घसरला


pravin.lonkar@timesgroup.com

नागपूर : दूध हे पूर्णान्न मानले जाते. मात्र, आता या दुधाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपुरातील २७ दूध विक्रेत्यांकडून कमी दर्जाच्या दुधाची विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेल्या तपासणीतच ही बाब पुढे आली असून, फसवणूक करणाऱ्या दूधविक्रेत्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे.

गायीच्या दुधाचे महत्त्व आपल्या संस्कृतीतही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, व्यावसायिक नफा कमविण्याच्या स्पर्धेत या दुधाच्या गुणवत्तेशीच छेडछाड होत असल्याचे वास्तव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नागपूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांकडून १०७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ८० दुधाचे नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले. मात्र, २७ नमुन्यांत गुणवत्ता घसरल्याचे दिसून आले. या २७ दूध उत्पादकांमध्ये नागपुरातील वेगवेगळ्या भागांतील डेअरींचा समावेश आहे. कमी गुणवत्तेचे दूध विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दूधउत्पादक आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. २७ दोषपूर्ण नमुन्यांपैकी १८ नमुने खुल्या दुधाची विक्री करणाऱ्या दूधविक्रेत्यांकडून गोळा करण्यात आली होती. नऊ नमुने पॅकेटमध्ये दुधाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून घेण्यात आले होते.

बड्या उत्पादकांचाही समावेश

कमी गुणवत्तेचे दूध विक्री करणाऱ्यांमध्ये बड्या दूधउत्पादक आणि विक्रेत्यांचाही समावेश आहे. दिवसाला ५०० लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन आणि १२ लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या दूध उत्पादकांचे दूध गुणवत्तेत कमी आढळले तर त्यांच्यावर न्याय निर्णय प्रकरणे म्हणून खटले दाखल केले जातात. नागपुरातील अशा सात दूध उत्पादकांवर खटले दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून २७ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. छोट्या दूधउत्पादकांवर खटले दाखल न करता त्यांच्याकडून तडजोडीच्या स्वरूपात कारवाई केली जाते. नागपुरातील १२ दूध उत्पादकांकडून ७७ हजार रुपये वसूल करण्यात आले. नऊ प्रकरणांचा निर्णय अद्याप व्हायचा आहे.

या दूध उत्पादकांवर कारवाई

(दूध विक्रेता केंद्र व दंड)

गोकुळ डेअरी, नंदनवन : ७ हजार रुपये

हरिओम डेअरी, झिंगाबाई टाकळी : ७ हजार रुपये

शंकर चौधरी, खापरी : १६ हजार रुपये

पारस डेअरी, महाल : ८ हजार रुपये

अनुज डेअरी, झिंगाबाई टिकळी : खटला दाखल-निकाल प्रलंबित

गोकुळ डेअरी, भरतनगर : १० हजार रुपये

वात्सल्य डेअरी, धरमपेठ : खटला दाखल-निकाल प्रलंबित

ओम श्री गुरुकृपा : खटला दाखल-निकाल प्रलंबित

गुप्ताजी शिवसागर, इंदोरा : खटला दाखल-निकाल प्रलंबित

भंडारा जिल्हा दुग्धउत्पादक सहकारी संस्था : खटला दाखल-निकाल प्रलंबित

शांती डेअरी, इतवारी : १२ हजार दंड

वृंदावन डेअरी : ५ हजार दंड

वैष्णव डेअरी, हंसापुरी : खटला दाखल-निकाल प्रलंबित

नरेश दूध केंद्र, नंदनवन : खटला दाखल-निकाल प्रलंबित

अशी तपासली जाते गुणवत्ता

गायीचे दूध असेल तर त्यात फॅट कमीत कमी ३.५ असायलाच हवा. एसएनएफ म्हणजे सॉलिट नॉट फॅट (शुगर, प्रोटीन इ.) ८.५ पेक्षा कमी नसावे. म्हशीच्या दुधासाठी फॅट ६ टक्के आणि एसएनएफ ९ टक्के अशी मर्यादा आखून दिली आहे. मिक्स मिल्क असाही एक प्रकार आहे. यासाठी फॅट ४.५ आणि एसएनएफ ८.५ असे प्रमाण आहे. स्टॅण्डर्डाइज्ड मिल्कसाठी फॅट ४.५ आणि एसएनएफ ८.५, रिकम्बाइन्ड मिल्कसाठी फॅट ३ आणि एसएनएफ ८.५, टोन्ड मिल्कसाठी फॅट ३ टक्के आणि एसएनएफ ८.५ टक्के, डबल टोन्ड मिल्कसाठी फॅट १.५ टक्के आणि एसएनएफ ९ टक्के, फूल क्रिम मिल्कसाठी फॅट ६ टक्के आणि एसएनएफ ९ टक्के असे प्रमाण आखून देण्यात आले आहे. दूध उत्पादकांकडून या गुणवत्तेतच छेडछाड करण्यात आली असल्याचे या तपासात पुढे आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज