अ‍ॅपशहर

सिटीस्कॅन करायचाय? दोन आठवडे थांबा!

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये अर्थात मेडिकल आणि मेयो एकमेव आशेचा किरण आहेत. मात्र येथे आल्यानंतर रुग्णांच्या पदरात पडणारी गैरसोय कमी होताना दिसेनाशी झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 28 Jan 2020, 1:22 pm
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम citiscan


आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये अर्थात मेडिकल आणि मेयो एकमेव आशेचा किरण आहेत. मात्र येथे आल्यानंतर रुग्णांच्या पदरात पडणारी गैरसोय कमी होताना दिसेनाशी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी खुद्द ही वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर संबंधितांना चांगलेच खडसावले होते. मात्र, त्यांची पाठ फिरताच पुन्हा या समस्येने डोके वर काढले आहे. सिटीस्कॅनसारख्या तातडीच्या निदानासाठीही रुग्णांना दोन दोन आठवड्यांच्या प्रतीक्षा यादीला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार पुन्हा निदर्शनास येत आहे.

मेंदूशी निगडीत व्याधीपासून ते इतर निदानासाठी मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टर अनेकदा रुग्णांना सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या निदान चाचण्या सुचवितात. त्याचा अहवाल आल्याशिवाय अशा रुग्णांना पुढील उपचारांची दिशा ठरविता येत नाही. मात्र, अशा निदानासाठी रुग्ण मेडिकलच्या क्ष-किरण विभागात आला असता त्यांना प्रतीक्षा यादीत टाकले जाते. वास्तविक, मेडिकलमध्ये ट्रॉमा केअर सेंटर आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयातही तीन सीटी स्कॅन यंत्र उपलब्ध आहेत. अशा वेळी त्यांना इथे रेफर करणे शक्य असतानाही रुग्णांच्या हाती प्रतीक्षा यादी दिली जाते. सध्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना सीटी स्कॅनसाठी वीस, तर वॉर्डात दाखल रुग्णाला सात दिवसांनंतरची तारीख दिली जाते.

निदानासाठी इतका वेळ लागला आणि मध्येच जीवाचे काही बरेवाईट झाले तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अशाच तक्रारीवरून अलीकडेच वैद्यकीय संचालक डॉ. लहाने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावत प्रतीक्षा यादी संपवण्याचे आदेशही दिले होते. परंतु त्यानंतरही प्रतीक्षा यादी संपत नसल्याने प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासन संचालकांच्याच आदेशालाही जुमानत नाहीत, हे या प्रतीक्षा यादीवरून सिद्ध होत असल्याने कारवाई करणार कोण, हादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.

या बाबत विभागप्रमुख डॉ. आरती आनंद यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, वॉर्डात भरती रुग्णांना प्राधान्याने सीटी स्कॅन काढला जातो. मात्र, गेले तीन दिवस यंत्र तांत्रिक कारणाने बंद होते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना दहा ते पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. परंतु तातडीने ही प्रतीक्षा यादी संपवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज