पारा घसरणार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
गेल्या काही दिवसांपासून तयार झालेल्या पावसाळी वातावरणापासून नागपूरकरांची लवकरच सुटका होणार आहे. आज, शनिवारपासून ढगाळ आणि पावसाळी वातावरण शहराचा निरोप घेणार असून आकाश मोकळे होणार आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोरड्या वातावरणामुळे पाऱ्यात ३ ते ४ अंशाची घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी विक्षोप म्हणून संबोधले जाते. यंदा येणारा पश्चिमी विक्षोप हा अरबी समुद्रातील आर्द्रतासुद्धा घेऊन येत आहे. त्यामुळे यंदा उत्तरेकडे हिमवृष्टीसोबतच पाऊससुद्धा हजेरी लावीत आहे. त्यामुळे विदर्भात नेहमी उत्तरेकडून येणारे थंड वारे यंदा दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व या दिशेनेसुद्धा येत आहेत. यामुळे विदर्भात आर्द्रता वाढून पावसाळी वातावरण तयार झाले आणि विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथे वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. मात्र, हवेत गारवा असल्याने ही थंडी बोचरी ठरते आहे. शुक्रवारीसुद्धा विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. परंतु, शनिवारपासून ही परिस्थिती बदणार असून आकाश मोकळे होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे पारा घसरेल. शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर वगळता सगळ्याच जिल्ह्यांतील तापमान किमान १० अंशांहून अधिक होते. सात जिल्ह्यांमधील तापमान तर १५ अंशांहून अधिक होते. नागपुरात शुक्रवारी १५.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासून ही परिस्थिती बदलेल. पाऱ्यात ३ ते ४ अंशांची घसरण अपेक्षित असून, पारा १०च्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ६ जानेवारीपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असून पारा ९ अंशांपर्यंत घसरू शकतो. परंतु ७ जानेवारी रोजी परत एकदा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उत्तरेत हिमवृष्टीचा कहर
६ ते ८ जानेवारी यादरम्यान नव्याने पश्चिमी विक्षोपाची परिस्थिती तयार होणार आहे. यादरम्यान हिमालय आणि आसपासच्या परिसरात अति हिमवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या तीन दिवसांत उत्तरेकडे दरड कोसळण्यासारखे प्रकार घडण्याची शक्यता असून तेथे 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. या हिमवृष्टीचा परिणाम देशातील इतर भागातील तापमानावरसुद्धा होण्याची शक्यता आहे. यंदा येणाऱ्या पश्चिमी विक्षोपात अरबी समुद्रातील आर्द्रतासुद्धा असल्याने विदर्भात यादरम्यान परत एक दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.