म.टा. वृत्तसेवा, वाशीम
मानोरा ते दिग्रस रस्त्यावरील पॉवरहॉऊस जवळ कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील दोन लहान भाऊ जागीच ठार झाले, तर आईवडील गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. हरिओम शंकर सोंगे (वय ६) सोहम शंकर सोंगे (वय ३) अशी मृत बालकांची, तर शंकर पंजाब सोंगे (वय ३३), शीतल शंकर सोंगे (वय २४, सर्व रा. वाईगौळ), अशी जखमींची नावे आहेत.
वाईगौळ येथील शंकर सोंगे हे पत्नी शीतल, मुलगा हरिओम व सोम यांच्यासह दुचाकी (एमएच २९ क्यू १६६९)ने गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास दिग्रसला येत होते. याचवेळी दिग्रसवरून मानोराकडे जाणाऱ्या एमएच ३९ एल ९२०० क्रमांकाच्या भरधाव कारने शंकर यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत सहा वर्षीय हरीओम आणि तीन वर्षीय सोम हे दोघे भाऊ जागीच ठार झाले. तर त्यांची आई शीतल व वडील शंकर हे गंभीर जखमी झाले. शंकर आणि शीतल यांना उपचारासाठी तातडीने दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला पाठविण्यात आले. दरम्यान, अपघात होताच कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले करीत आहेत.