अ‍ॅपशहर

डॉक्टरांचे निवृत्ती वय वाढणार

डोंगरदऱ्या, दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते उपकेंद्रापर्यंत रुग्णालये चालविते. याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांची नेहमीच वानवा असते. याला आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांचाही अपवाद नाही. त्यात येथे सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा निवृत्तीकाळ जवळ आला आहे.

MT 19 May 2019, 1:07 am
आरोग्य विभागाने मागविली माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम doctor


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

डोंगरदऱ्या, दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते उपकेंद्रापर्यंत रुग्णालये चालविते. याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांची नेहमीच वानवा असते. याला आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांचाही अपवाद नाही. त्यात येथे सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा निवृत्तीकाळ जवळ आला आहे. त्यामुळे येथे मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत डॉक्टरांचे निवृत्तीवय वाढवून ते ६५वर करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने मागविलेल्या माहितीवरून हे संकेत मिळत आहेत.

ग्रामीण आणि दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देणारे प्रमुख डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारित राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, पोलिस रुग्णालये, उपजिल्हा, ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर रुग्णालये आणि दवाखाने येतात. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुमारे १२ हजार पदे मंजूर आहेत. त्यातील ३० टक्के पदे रिक्त आहेत. शिवाय, जेथे डॉक्टरांचे मनुष्यबळ आहे, त्यापैकी अनेक ठिकाणच्या डॉक्टरांचा निवृत्ती कालावधी जवळ आला आहे. त्यामुळे लवकरच ही पदेदेखील रिक्त होणार आहेत. त्यामुळे त्या भागात डॉक्टरांच्या तोकड्या संख्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. रिक्त पदांची संख्या पाहता, सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ करण्याची तयारी चालविली आहे. विभागाने मागविलेल्या माहितीच्या आधारे निवृत्तीवय वाढविण्याचा प्रस्ताव सरकारला सादर होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.

दुर्गम भागातील रुग्णांना लाभ


या सगळ्या प्रक्रियेसाठी आणखी तीन महिने कालावधी लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत निवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना या पासून वंचित राहावे लागू शकते. यासंदर्भात राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेशी संपर्क साधला असता, संघटनेचे पदाधिकारी डॉ. प्रमोद रक्षमवार यांनीही दुजोरा दिला. डॉक्टरांचे निवृत्तीवय वाढले तर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ दुर्गम भागातील रुग्णांनाच होईल. त्यामुळे वैद्यकीय सेवा प्रभावित होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज