अ‍ॅपशहर

देवालाही आता गुणवत्तेचा भोग! विषबाधा टाळण्यासाठी 'एफडीए'चा पुढाकार; धार्मिक स्थळांचे होणार ऑडिट

Blissful Hygienic Offering to God : वर्धा मार्गावरील साई मंदिर आणि वाठोडा येथील स्वामिनारायण मंदिर यांना याबाबतचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र देण्यात आले असून, त्यानंतर पुन्हा त्यांना या प्रक्रियेतून जावे लागेल, असे एफडीएचे साहाय्यक आयुक्त (अन्न) ए. आर. देशमुख आणि अनंत देशमुख यांनी सांगितले.

Authored byप्रवीण लोणकर | महाराष्ट्र टाइम्स 24 Nov 2022, 12:56 pm
नागपूर : महाप्रसादातून विषबाधा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. भक्तिभावाने स्वीकारण्यात येणारा प्रसादही चांगल्या गुणवत्तेचा असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने आता पुढाकार घेतला आहे. ‘एफएसएसएआय’ च्या नियमानुसार महाप्रसाद वितरित होणाऱ्या धार्मिक स्थळांचे ऑडिट करून गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्यांना ‘भोग’ म्हणजेच ‘ब्लिसफूल हायजेनिक ऑफरिंग टू गॉड’ असे प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prasad sweer
देवालाही आता गुणवत्तेचा भोग; विषबाधा टाळण्यासाठी एफडीएचा पुढाकार


शहरातील साई मंदिर आणि स्वामिनारायण मंदिराला गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळाले असून लवकरच इतर मंदिरांचेही ऑडिट होईल. भारतीय खाद्य सुरक्षा प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) निर्देशांनुसार, एफडीएने मंदिराच्या महाप्रसादाला प्रमाणित करण्यासाठी पुढाकार घेतला. ज्या धार्मिक स्थळी नियमित महाप्रसादाचे वाटप करण्यात येते, त्या प्रार्थना स्थळांना प्राधान्याने प्रमाणित करण्यात येणार आहे. देवालाही स्वच्छ आणि शुद्ध महाप्रसादच अर्पण करा या संकल्पनेवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्धा मार्गावरील साई मंदिर आणि वाठोडा येथील स्वामिनारायण मंदिर यांना याबाबतचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. दोन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र देण्यात आले असून, त्यानंतर पुन्हा त्यांना या प्रक्रियेतून जावे लागेल, असे एफडीएचे साहाय्यक आयुक्त (अन्न) ए. आर. देशमुख आणि अनंत देशमुख यांनी सांगितले.

अशी होते तपासणी

-प्रमाणपत्र मिळण्यासाठी मंदिरांना एफडीएचा अन्न परवाना मिळवावा लागेल. त्यानंतर परवान्याच्या अटीमध्ये नमूद असलेल्या निकषांचे पालन त्यांना करावे लागेल. https://eatrightindia.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते.

-त्यानंतर दोन टप्प्यांमध्ये ऑडिट केले जाते. स्वच्छतेचे निकष पाळले जातात का, खाद्यपदार्थ कसे वापरण्यात आले आहेत, याची तपासणी करून काही त्रुटी आढळली तर त्याची पूर्तता करण्याची संधी दिली जाते.

-प्रसाद बनविण्यासाठी आणि पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, खाद्य साहित्य, स्वयंपाकघर, कामगारांची वैद्यकीय तपासणी, अन्नपदार्थ खरेदीचा अहवाल, नियमित पेस्ट कंट्रोल या सर्व बाबी तपासल्या जातात. महाप्रसाद वितरित करण्यासाठी कोणते साहित्य वापरले जाते याचीही तपासणी होते. अन्नसुरक्षा अधिकारी यात मोलाची भूमिका पार पाडतात.

-तेथील कर्मचाऱ्यांना किंवा सेवेकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते. फूड सेफ्टी ट्रेनिंग अॅण्ड सर्टिफिकेशन (एफओएसटीएसी) असा अभ्यासक्रम त्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यानंतर अंतिम ऑडिट केले जाते. याचा अहवालही संकेतस्थळावर अपलोड केला जातो. या ऑडिट अहवालानुसार ‘एफएसएसएआय’ भोग प्रमाणपत्र देतो. सध्या तरी हे प्रमाणपत्र मिळविणे ही ऐच्छिक प्रक्रिया आहे.

महत्वाचे लेख