\Bपरीक्षेनंतर शाळेतच मृत्यू \B
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाला. प्रणीष प्रशांत पहुने (१४ वर्षे) असे मृतकाचे नाव आहे. तो येरला गावातील जैन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी होता.
ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. सध्या प्रणीषची शाळेत परीक्षा सुरू आहे. परीक्षा संपल्यानंतर तो शाळेच्या मैदानात चालत होता. चालताना तो अचानक कोसळला. तो शुद्धीवर येत नसल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने त्याला तातडीने अॅलेक्सिस हॉस्पिटल येथे भरती केले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याचे हृदय काम करीत नसल्याचे लक्षात आले. तसेच त्याचा रक्तप्रवाहसुद्धा बंद होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याची अंत्ययात्रा आज, शनिवारी दुपारी १२ वाजता मोक्षधाम घाटाकडे निघेल.