अ‍ॅपशहर

Kutte Waale Baba Ka Ashram: एकाच घरात ६० कुत्रे, दररोज ५० किलो चपाती, नागपुरातील 'कुत्ते वाले बाबा का आश्रम' आहे तरी काय

Kutte Waale Baba Ka Ashram Nagpur: खुर्च्या, पलंग, टेबलांवर आणि मंदिराच्या आतही नागपूरच्या 'कुत्ते वाले बाबा का आश्रमा'त जवळपास सर्वत्र भटके कुत्रे झोपताना दिसतात. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशानंतर भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद होता. असं असतानाही शतकानुशतके या जुन्या आश्रमात नेहमीच भटक्या कुत्र्यांना एखाद्या व्यक्तीप्रमाणेच वागवलं जातं, त्यांच्या जेवणाची सोय केली जाते.

Authored byकरिश्मा भुर्के | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Oct 2022, 3:26 pm
जुन्या नागपूरच्या वस्तीचा एक भाग असलेल्या शांतीनगर इथे 'कुत्ते वाले बाबा का आश्रम' आहे. इथून जाताना ठिकठिकाणी असणाऱ्या भटक्यांना चुकवणं शक्य नसतं. दररोज संध्याकाळी, केवळ इथे राहणाऱ्या कुत्र्यांसाठीच नाही, तर आश्रमाच्या बाहेर राहणाऱ्या कुत्र्यांसाठीही जवळपास ५० किलो गव्हाच्या पिठाच्या चपात्या तयार केल्या जातात. या चपात्या दुधात भिजवल्या जातात आणि नंतर स्वयंसेवक त्या भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी अनेक ठिकाणी ठेवतात. आश्रमाचे भक्त याकडे धार्मिक कार्य म्हणून पाहतात. या आश्रमाचे विश्वस्त एकनाथ कवडे यांनी सांगितलं, की, आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं, की जे प्राणी स्वतःसाठी बोलू शकत नाहीत, त्यांना खायला घालणे हे देवाचं काम, कर्तव्यच आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kutte waale baba ka ashram in nagpur home for stray dogs from 100 years
Kutte Waale Baba Ka Ashram: एकाच घरात ६० कुत्रे, दररोज ५० किलो चपाती, नागपुरातील 'कुत्ते वाले बाबा का आश्रम' आहे तरी काय


कुत्रे खाण्यासाठी येतात आणि...

आश्रमातील कुत्र्यांची संख्या सतत बदलते, प्रजनन हंगामही वाढतो असंही त्यांनी सांगितलं. अनेक असे भटके कुत्रे आहेत जे केवळ अन्नासाठी इथपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर हे आश्रम कधीही सोडत नाहीत. अनेक कुत्र्यांचा इथेच जन्म झाला आहे. नोकरी करणारे असे लोक आहेत जे त्यांचे पाळलेले कुत्रे इथे सोडतात. तसंच असेही कित्येक जण आहेत जे आता कुत्र्यांना पुढे सांभाळू शकत नाहीत किंवा काळजी घेऊ शकत नाहीत ते लोकही त्यांच्या पाळीव प्राण्याला या आश्रमात सोडतात.

आश्रमात अंदाजे ६० कुत्रे

सध्या आश्रमात अंदाजे ६० कुत्रे आहेत, पण दरवर्षी महिनाभरात ही संख्या शंभरच्या पुढे जाते. नियमानुसार, कुत्रा जिथे बसला आहे तिथून आम्ही त्याला कधीही हाकलून देत नाही, असंही या आश्रमाच्या विश्वस्तांनी सांगितलं. यापैकी एकाही कुत्र्याला नाव दिलेलं नाही, यामागे तसं काही कारणही नाही, असंही म्हणाले. कुणी कुत्र्याला नावाने हाक मारली तरी आमची काही हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

गुरु परमहंस रामसुंबर बाबा

हे आश्रम, कुत्र्यांसाठी केलं जाणारं हे काम कसं सुरू झालं यावर बोलताना विश्वस्तांनी सांगितलं, की आमचे गुरु परमहंस रामसुंबर बाबा शंभर वर्षांपूर्वी नागपुरात आले. ते याच ठिकाणी आले होते. त्यांनीच हे सुरू केल्याचं सांगण्यात आलं. त्यांनी सर्व भटक्या प्राण्यांना खायला दिलं आणि त्यांच्यात चांगलं नातंही निर्माण झालं. प्राण्यांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या क्षमतेच्या आख्यायिका दूरवर पसरल्या. त्यानंतर बाबांची लोकप्रियता वाढली.

कित्येक वर्षांपासून सुरू आहे हे काम

एकदा त्यांचं वय विचारलं असता, बाबांनी उत्तर दिलं, की ते रामाच्या काळातही उपस्थित होते. हे आश्रमाचे गुरु परमहंस रामसुंबर बाबा यांचे भक्त, अनुयायी आजही भटक्या कुत्र्यांसाठी खायला बनवतात. १९६७ मध्ये बाबांनी सर्व भक्तांसमोर आश्रमात समाधी घेतली. दरवर्षी जुलै महिन्यात रथ यात्रा काढली जाते. या आश्रमात कुत्र्यांना रॉयल वागणूक मिळते. त्यांना अत्यंत पवित्र ठिकाणी, बाबांच्या समाधीच्या एका छोट्या मंदिरातही प्रवेश दिला जातो, असंही विश्वस्त म्हणाले.

एकाही कुत्र्याने हल्ला केलेला नाही

मागील १०० वर्षात आश्रमात एकाही कुत्र्याने हल्ला केलेला नाही. आपण माणसंच या प्राण्यांवर हल्ला करतो, असं ते म्हणाले. आजही त्यांच्या आश्रमाचे दरवाजे भटक्या कुत्र्यांसाटी नेहमीच खुले असतात. माणसं अन्न मागू शकतात, कुत्रा काय करणार? त्यांना खायला देण्यात आम्हाला धन्यता वाटते, असं या आश्रमातील अनुयायांचं म्हणणं (Kutte Waale Baba Ka Ashram Nagpur) आहे.

लेखकाबद्दल
करिश्मा भुर्के
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज