अ‍ॅपशहर

रामटेक, वर्धा, सावनेरपर्यंत धावणार मेट्रो

महामेट्रो आणि रेल्वे यांच्यात आज करारमटा...

Maharashtra Times 16 Jul 2018, 4:00 am

महामेट्रो आणि रेल्वे यांच्यात आज करार

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे नियोजन पूर्ण होत नाही तोच मेट्रो आता जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काटोल, वर्धा, रामटेक, भंडारा, सावनेर इथपर्यंत ही मेट्रो धावेल. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आज, सोमवारी महामेट्रो आणि भारतीय रेल्वेत यांच्यात करार करण्यात येणार आहे.

मास रॅपीड ट्रान्झिट सिस्टीमअंतर्गत मेट्रोचे नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात आज सकाळी १० वाजता याबाबतचा करार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे आणि कोळसामंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मंडळ रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार आदींच्या उपस्थितीत हा करार होणार आहे.

महाराष्ट्रातील मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने महामेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड) ही कंपनी स्थापन केली. नागपूर, पुण्यानंतर आता महामेट्रो ठाण्यातील मेट्रोरेल्वेचेही काम हाती घेणार आहे. महामेट्रोवरील जबाबदारी वाढत असून नागपूर मेट्रो जिल्ह्यातील इतर भागांतही नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामेट्रो आणि रेल्वे यांच्या सहकार्यातून मेट्रो रेल्वेचा पुढील विस्तार करण्यात येणार आहे. रेल्वेच्या ट्रॅकवर ही फिडर ट्रेन धावणार आहे. महामेट्रोकडून ही सेवा चालविण्यात येईल. यामुळे वाहतुकीला गती मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी सांगितले.

पहिला प्रयोग नागपुरात

काटोल, वर्धा, रामटेक, भंडारा, सावनेरपर्यंत फिडर ट्रेन जोडण्यात आल्याने कमी वेळात या शहरात पोहोचता येणार आहे. विदर्भातील अर्थशास्त्राला यामुळे गती मिळेल. रेल्वेच्या मार्गावर मेट्रो धावणार असून या प्रयोगामुळे मेट्रोला प्रवासी मिळतील. रेल्वेच्या ट्रॅकवर मेट्रो धावण्याचा हा पहिला प्रयोग आहे. शहरातील गर्दी कमी होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईल, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज