अ‍ॅपशहर

​ बंद कार पार्किंगला द्या ‘सौरऊर्जा’

सीताबर्डीतील बंद असलेले मल्टीलेव्हल कार पार्किंग सुरू करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्याचा सल्ला नासुप्रला देण्यात आला आहे. ८४ वाहने पार्क होऊ शकतील, असे पार्किंग परवडत नसल्याने बंद करण्यात आले आहे. पार्किंग चालविणे तोट्याचे काम असल्यामुळे नफ्यात कसे आणता येईल, यासाठी विविध उपायांवर चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Times 25 May 2017, 4:00 am
pravin.lonkar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur give solar energy to closed car parking
​ बंद कार पार्किंगला द्या ‘सौरऊर्जा’

Tweet : @pravinlonkarMT
नागपूर : सीताबर्डीतील बंद असलेले मल्टीलेव्हल कार पार्किंग सुरू करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्याचा सल्ला नासुप्रला देण्यात आला आहे. ८४ वाहने पार्क होऊ शकतील, असे पार्किंग परवडत नसल्याने बंद करण्यात आले आहे. पार्किंग चालविणे तोट्याचे काम असल्यामुळे नफ्यात कसे आणता येईल, यासाठी विविध उपायांवर चर्चा सुरू झाली आहे.

२००६ मध्ये नागपुरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी, ट्रान्सपोर्ट वाहने अशी मिळून ८ लाख २४ हजार १८५ वाहने होती. आता या वाहनांची संख्या १५ लाखांच्या घरात गेली आहे. यात चारचाकींची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, कार पार्किंगसाठी शिस्तबद्ध व्यवस्था नागपुरात नाही. नासुप्रचे एकमेव कार पार्किंगही बंद पडले. त्यामुळे नासुप्रचे सीताबर्डीतील मल्टीलेव्हल कार पार्किंग चालविणे फायदेशीर आहे की तोट्याचे, फायद्यात चालविण्यासाठीच्या उपाययोजना आदींचा अभ्यास करून अहवाल सोपविण्याचे काम जीआर एन्टरप्रायजेसला देण्यात आले होते. जीआर एन्टरप्रायजेसने नुकताच आपला अहवाल नासुप्रकडे सादर केला.

पार्किंग प्लाझाच्या इमारतीवर ६.२५ केव्हीए क्षमतेचा सोलर पॉवर प्लान्ट बसविला तर दिवसाला २६ युनिट्स वीज निर्माण होईल. ही सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी ४ लाख ते ४.२५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

६ लाखांचा तोटा

सीताबर्डीतील ‘पार्किंग प्लाझा’ चालविण्यासाठी वीज, मनुष्यबळ असा सर्व खर्च मिळून वर्षाला २१ लाख रुपयांचा खर्च आहे. कार पार्किंगच्या माध्यमातून १५ लाख रुपये नासुप्रला प्राप्त होतात. त्यामुळे वर्षाला ६ लाखांचा तोटा कसा भरून काढायचा, यावर विचारमंथन सुरू आहे. तोट्यात चालणारे पार्किंग प्लाझा चालविण्यासाठी कुणी कंत्राटदारही इच्छूक नसल्याचे नासुप्रचे म्हणणे आहे. सीताबर्डी येथे शहरातील मोठी बाजारपेठ असल्याने कुटुंबासह खरेदीसाठी येणाऱ्यांना या पार्किंगमुळे मोठी सुविधा निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या कार पार्किंगचा फारसा उपयोगच झाला नाही.

तांत्रिक दोषाचे काय ?

‘नासुप्र’ने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर व्हरायटी चौक परिसरात वाहनतळ इमारत उभारली आहे. या इमारतीचे बांधकाम राय उद्योग समूहाने केले आहे. एकाचवेळी ७२ कार पार्क होऊ शकतील, अशी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. इमारत बांधकाम खर्च कंत्राटदाराने केलेला आहे. त्यामुळे त्याला व्यावसायिक वापरासाठी सुमारे ४०० चौरस फूट जागा देण्यात आली आहे. खासगी विकासकाकडे १२ पार्किंग स्लॉट आहेत. पार्किंग प्लाझा चालविणे परवडत नसल्याचे सांगत गेल्या कित्तेक दिवसांपासून हे पार्किंग बंद आहे. या पार्किंग प्लाझामध्ये केवळ छोट्या कार पार्क होऊ शकतात, त्यामुळे तांत्रिक दोषही दूर करण्याची मागणी होऊ लागली आहे.

असे असेल पार्किंग दर

तास : रुपये

० ते ३ तास : ३० रुपये

० ते ६ तास : ४० रुपये

० ते ९ तास : ५० रुपये

० ते १२ तास : ६० रुपये

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज