अ‍ॅपशहर

विदर्भाचे राजकुमार

एकाच पक्षाचे चार राजकीय लोकं जमले की, ‘आवाज कुणाचा’ म्हणून आरोळी का ठोकतात, हा खरेतर कायमच जिज्ञासेचा प्रश्न आहे. एकतर जो ओरडतो, त्याला आपला आवाज नेमका किती जणांना माहिती आहे, याची खात्री तरी करून घ्यायची असेल अथवा आपण सकाळपासून जी मंडळी सोबत घेऊन फिरतो आहोत, ती अजूनही आपल्या सोबतच आहे की नाही, याची टेस्ट तरी घ्यायची असेल. त्यासाठी तो हे उपद्व्याप करीत असावा बहुतेक.

Maharashtra Times 17 Feb 2017, 4:00 am
एकाच पक्षाचे चार राजकीय लोकं जमले की, ‘आवाज कुणाचा’ म्हणून आरोळी का ठोकतात, हा खरेतर कायमच जिज्ञासेचा प्रश्न आहे. एकतर जो ओरडतो, त्याला आपला आवाज नेमका किती जणांना माहिती आहे, याची खात्री तरी करून घ्यायची असेल अथवा आपण सकाळपासून जी मंडळी सोबत घेऊन फिरतो आहोत, ती अजूनही आपल्या सोबतच आहे की नाही, याची टेस्ट तरी घ्यायची असेल. त्यासाठी तो हे उपद्व्याप करीत असावा बहुतेक. एखाद्या संघटनेची घोषणा, पक्षाचे नाव कसे ठाम पाहिजे. समोरच्याला कनफ्युजन नको. रिस्क घ्यायची कशाला?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur vidarbhas raajkumar
विदर्भाचे राजकुमार


आमच्या राजकुमारांचेच बघा ना, त्यांनी पक्ष काढला आणि नाव ठेवलं ‘विदर्भ माझा’. पुढे झंझटच नको. नाहीतर अलीकडे बघितलं नाही का तुम्ही, समाजवादी पार्टी कुणाची आहे असं विचारावं लागते. बसपच्या हत्तीचा माहुत कोण आहे, जनता दलाचं चक्र सध्या कुणाच्या करंगळीत फिरतं, ते माहितीच नाही. भविष्यात असा काही घोटाळा होऊ नये म्हणून त्यांनी थेट नाव ठेवलं. दुसरं म्हणजे विदर्भ कुणाचा, अशी घोषणा देणाऱ्यांचे आवाजही बंद करून टाकले. नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी काटोलमध्ये विदर्भाचे पॅनेल निवडून आणले. चांगलाच उदो उदो झाला त्यांचा. काही विदर्भ‘वीरां’ना बघवलं नाही ते. उठले पोटशूळ, झाले आरोप सुरू. ते नगरसेवक तर जुनेच राजकीय कार्यकर्ते आहेत, त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून यांना रेडिमेड लोकं मिळाले वगैरे वगैरे....! थेटच बोलायचं झालं तर आजच्या जगात, एखादी वस्तू वेगळेच लोक बनवतात, ते घेतात भलतेच लोक आणि त्यावर लेबल लावून मार्केटमध्ये विकणारे असतात तिसरेच. क्रेडिट तर शेवटी लेबल ज्याचं त्यालाच जातं नं...! महापालिका निवडणुकीतही राजकुमारांनी असाच प्रयोग केला आहे. ज्यांना पक्षांनी उमेदवारी दिली नाही, जे अपक्ष म्हणून मैदानात होते त्यांच्यावर लेबल चिपकविले. खपले तर आपले!

राजकुमारांना विदर्भाचा वसा वारश्यात मिळाला, बारश्यात नाही. त्यामुळे विदर्भाशी ते पक्के एकनिष्ठ आहेत. त्यांचे विरोधक म्हणतात, एकदा यांनी रामटेकमधून महाराष्ट्रवाद्यांनी धनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला होता. असेल ना केला. कधीकधी आपलं प्रॉडक्ट श्रेष्ठ आहे की नाही, ते बघण्यासाठी दुसऱ्याचं प्रॉडक्ट टेस्ट करावं लागतच नं. तुमचं आपलं म्हणजे असं आहे की गोकुल वृंदावन वाल्याने गणेश सागरच्या वाट्याला जायचंच नाही. जाऊदे तुमच्याशी काय बोलावं, स्पोर्टमॅन स्पिरीटच नाही तुमच्यात. शेवटी एकच सांगतो, आमचे राजकुमार एकदा तिरोड्यातून हारले होते, पण काटोलमध्ये जिंकले की नाही जोरात? असंच असतं भाऊ, एमपीएससीच्या परीक्षेचे क्लासेस घेणारा मास्तर हा त्या परीक्षेत नापासच झालेला असतो. त्याच्याकडे शिकणारे मात्र धडाधड एमपीएसस्सी क्लीअर करतात. त्यामुळे फार टेन्शन घेऊ नका. एक कोणीतरी व्यक्ती आहे जी विदर्भासाठी भांडते आहे, लढते आहे. विदर्भाच्या नावासाठी काहीतरी करते आहे, तुमच्यानी त्यांच्याबद्दल चांगलं बोलणं होत नसेल तर वाईट तं नका बोलू राजेहो!

-चर्चिल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज