अ‍ॅपशहर

​ आदिवासींची परसबाग ठरतेय पोषणाचा आहार

​ उतावली, धारणी ः अंगणवाडीत खिचडी वाटली तरी ती तेथे न खाता घरी न्यायची आणि घरातील इतरांनीही त्यात हिस्सा मागायचा, अशी स्थिती असलेल्या मेळघाटात बालकांच्या पोषणाची अवस्था कल्पनेनेही समजू शकते. मात्र, आदिवासींच्या घरातच त्यांना सर्वांगीण पोषण‌ मिळावे, यासाठी त्यांच्याच आवारात परसबाग फुलविण्याचा प्रयोग मेळघाटात मूळ धरू लागला आहे. माता आणि बालकांसह अख्ख्या कुटुंबालाच चांगला आहार घेता यावा, यासाठी परसबागेचा प्रकल्प विविध आदिवासी गावांमध्ये राबविला जातो आहे.

Maharashtra Times 16 Nov 2017, 1:44 pm
उतावली, धारणी ः अंगणवाडीत खिचडी वाटली तरी ती तेथे न खाता घरी न्यायची आणि घरातील इतरांनीही त्यात हिस्सा मागायचा, अशी स्थिती असलेल्या मेळघाटात बालकांच्या पोषणाची अवस्था कल्पनेनेही समजू शकते. मात्र, आदिवासींच्या घरातच त्यांना सर्वांगीण पोषण‌ मिळावे, यासाठी त्यांच्याच आवारात परसबाग फुलविण्याचा प्रयोग मेळघाटात मूळ धरू लागला आहे. माता आणि बालकांसह अख्ख्या कुटुंबालाच चांगला आहार घेता यावा, यासाठी परसबागेचा प्रकल्प विविध आदिवासी गावांमध्ये राबविला जातो आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nutritional food to tribal
​ आदिवासींची परसबाग ठरतेय पोषणाचा आहार

इतर ठिकाणच्या शेतीप्रमाणेच मेळघाटातील पीकपद्धतीही गेल्या काही वर्षांत बदलत गेली आहे. सोयाबिनचा पेरा वाढल्याने तुटपुंज्या जम‌‌िनीत भाजीपाल्याची जागा आक्रसली गेली. त्यामुळे, घरच्या जमिनीतून येणारा भाजीपाला आहारातून गायब झाला. सोयाबिनसारख्या ‘कॅश क्रॉप’ मुळे हातात काही पैसे येत असले तरी घरच्या घरी पोषक भाजीपाला म‌िळण्याचा स्रोत बंद झाला. याशिवाय, डाळी, तेल यांचेही प्रमाण मेळघाटातील आदिवासींच्या आहारात कमी होते. डॉ. आशिष सातव यांच्या महान संस्थेने २०१२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणातही ही बाब प्रकर्षाने पुढे आली आणि त्यातून परसबागेची कल्पना पुढे आली. एक मुख्य रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला वसलेली घरे, असे मेळघाटच्या गावांचे स्वरूप असते. त्यामुळे, प्रत्येक घराच्या मागे पुरेशी जागा उपलब्ध असते. या जागेत घरातून निघणाऱ्या सांडपाण्याचा उपयोग करून भाजीपाला पिकवणे सुरू झाले. धारणी आणि चिखलदरा या दोन्ही तालुक्यांतील जवळपास वीस गावांमध्ये आज परसबागेची ही मोहीम राबविली जाते आहे.
‘परसबागेचा उपक्रम राबविण्यामागे आदिवासी कुटुंबामधील आहारपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. परसबाग ही त्याची सुरुवात आहे. गर्भवती माता, बालके यांच्यासह कुटुंबातील सर्वांच्या आहारात भाजीपाला आणि फळांचा समावेश फारसा आर्थिक बोझा न पडता व्हावा, हा यामागील विचार आहे. आम्ही निवडलेल्या गावांमधील अनेक आदिवासी कुटुंबांनी तो राबविणे सुरू केले आहे. या सगळ्याचा परिणाम पोषणावर होणार आहे. या कुटुंबातील आहारातही भाजीपाल्याचा समावेश झाल्याचा दिसून येऊ लागले आहे,’ असे डॉ. सातव यांनी मटाशी बोलताना सांगितले.
परसबाग आणि कुपोषणाबाबत सुरू असलेल्या या प्रयोगांना राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे सहकार्य लाभले आहे. या ‌शिवाय, केंद्र शासनानेही या प्रयोगाची दखल घेऊन त्यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे. मेळघाटातील इतर गावांमध्येही परसबागेचा हा प्रयोग राबविण्यास आता सुरुवात केली जाणार आहे. कुपोषणावर महाराष्ट्र सरकारने विशेष राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्नावर ही समिती काम करीत आहे. परसबागेचा हा उपक्रम राज्यातील इतरही आदिवासी आणि कुपोषणग्रस्त भागांमध्ये राबविण्याची सूचना केली असल्याचेही डॉ. सातव म्हणाले.

अशी फुलते परसबाग

कोरकूबहुल गावांमध्ये महान संस्थेकडून बियाणे पुरविण्यात आले आणि सांडपाण्याच्या आधारावर भाजीपाला कसा पिकवायचा, याचे प्रशिक्षण गावकऱ्यांना दिले गेले. पालक, भेंडी, वाटाणा, कोथिंबीर, भोपळा, वांगी, गाजर, बीट, टोमॅटो अशी विविध प‌िके या परसबागांमध्ये आदिवासी घेऊ लागले आहेत. अशा परसबागांमध्ये पपई किंवा इतर फळझाडेही बहरू लागल्याचे चित्र मेळघाटातील या गावांमधून दिसते. ज्या ठिकाणी सांडपाण्याव्यतिरिक्त पाण्याची सुव‌िधा उपलब्ध आहे, तेथे परसबागेत भाजीपाल्याचे अधिक उत्पादन होत असल्याचे दिसून आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज