म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
नागपूर महापालिकेचे उपायुक्त व निगम सचिव राजेश मोहिते यांची चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ मुख्याधिकारी संवर्गातील मोहिते हे गेल्या दीड वर्षांपासून मनपात कार्यरत होते. त्यांना तातडीने नियुक्तीच्या नव्या पदावर रूजू होण्यास नगरविकास विभागाने कळविले होते. मावळते आयुक्त संजय काकडे यांची नियुक्ती प्रतिक्षेत ठेवण्यात आली आहे. योगायोग म्हणजे काकडे हेदेखील नागपूर मनपातील उपायुक्त पदावरून चंद्रपूरला आयुक्त म्हणून नियुक्त होऊन गेले होते.
मोहिते यांच्याकडे नागपूर महापालिकेत अनेक जबाबदाऱ्या होत्या. उपायुक्त म्हणून त्यांच्याकडे अनेक विभागाची जबाबदारी असतानाच निगम सचिव ही अतिरिक्त जबाबदारी होती. परिवहन व्यवस्थापक म्हणूनही ते काम सांभाळत होते. काही काळ त्यांनी मनपात लेखाधिकारी पदाचीही जबाबदारी सांभाळली. मोहिते यांनी नागपूर जिल्ह्यातील काही नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. चंद्रपूर महापालिकेने विद्यमान आयुक्त काकडे यांना आता कुठली नवी जबाबदारी मिळेल याकडेही लक्ष आहे.