अ‍ॅपशहर

MBBS विद्यार्थ्यांना मिळणार 'ते' प्रशिक्षण

बलात्कार पीडितांची न्याय वैद्यक चाचणी योग्य प्रकारे व्हावी यासाठी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या न्यायवैद्यक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात बलात्कार पीडितांच्या न्यायवैद्यक चाचणीचा समावेश करण्यात आला आहे.

Maharashtra Times 20 Jul 2017, 2:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rape victims the forensic trial in mbbs course
MBBS विद्यार्थ्यांना मिळणार 'ते' प्रशिक्षण


बलात्कार पीडितांची न्याय वैद्यक चाचणी योग्य प्रकारे व्हावी यासाठी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या न्यायवैद्यक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात बलात्कार पीडितांच्या न्यायवैद्यक चाचणीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बलात्कार पीडितांची न्यायवैद्यक चाचणी कशी करावी हे आता एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पदवीचं शिक्षण घेतानाच शिकवलं जाणार आहे.

डॉ. इंद्रजित खांडेकर यांना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. कालीदास चव्हाण यांनी यासंबंधी पत्र पाठवले. न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने बलात्कार पीडितांच्या न्यायवैद्यक तपासणीसाठी नवीन नियमावली व अहवाल २०१३ मध्ये व त्यानंतर केंद्र सरकारने २०१४ मध्ये संपूर्ण देशासाठी नवीन नियमावली तयार केली होती. त्यानुसार, सर्व डॉक्टरांना नवीन नियमावलीनुसारच वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक केले होते. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर बलात्कार पीडितांची न्यायवैद्यक तपासणी करण्यासाठी जुन्या अहवालानुसारच प्रशिक्षण दिले जात होते. नवीन नियमावलीची अंमलबजावणी करताना बलात्कार पीडितांच्या न्यायवैद्यक तपासणीचा दर्जा सुधारण्यासंबंधी साशंकता होती. न्यायदानात गफलत होऊ नये, यासाठी डॉ. खांडेकर यांनी विद्यापीठाशी वारंवार पत्रव्यवहार केला होता.

आरोग्य विद्यापीठाच्या प्यारा क्लिनिकल अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. हेमंत गोडबोले व डॉ. शैलेश मोहिते यांनी मी सुचवलेला बदल मंजूर करण्याचा ठराव संमत केला. हा ठराव विद्यापीठाच्या विद्याशाखेने मंजूर करून प्रात्यक्षिक पुस्तिकेत बदल केला, अशी माहिती डॉ. खांडेकर यांनी दिली. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाच्या न्यायवैद्यक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात आल्याची माहिती नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिली. डॉ. खांडेकर यांनी २०१० मध्ये त्यांच्या २५८ पाणी अहवालातून बलात्कार पीडितांच्या न्यायवैद्यक तपासणीची चेष्टा व त्यामुळे होणारी न्यायदानाची गफलत अधोरेखित केली होती तसेच अशा तपासणीसाठी योग्य नियमावली, तसेच डॉक्टरांना योग्य प्रशिक्षण नसणे हे चुका होण्याचे एक मुख्य कारण आहे, असे नमूद केले होते. बलात्कार पीडितांची न्यायवैद्यक चाचणी कशी करावी हे आता एमबीबीएसची पदवी घेतानाच शिकवले जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज