अ‍ॅपशहर

Satish Ukey:'त्या' लॅपटॉपमध्ये लोया केस,फडणवीसांविषयी महत्त्वाची माहिती, उकेंच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Satish Ukey | काँग्रेस पक्षाच्या जवळचे म्हणून सतीश उके यांचा लौकिक आहे. सतीश उके यांनी आतापर्यंत अनेक भाजप नेत्यांना अंगावर घेतले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही सतीश उके न्यायालयात याचिका दाखल केली होती

Authored byरोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2022, 10:55 am

हायलाइट्स:

  • सकाळी साडेपाच वाजता ईडीचे अधिकारी सुरक्षारक्षकांचा फौजफाटा घेऊन आमच्या घरी आले
  • अधिकाऱ्यांनी आम्हा सर्वांचे मोबाईल फोन जप्त केले
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Satish Ukey Family
Satish Ukey | सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनेक केसेस केल्या होत्या. यापैकी एका प्रकरणाचा निकाल तीन ते चार दिवसांत लागणार आहे.
नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच ईडीने सतीश उके यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सतीश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महत्त्वाची माहिती होती. त्या आधारे भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. त्यामुळेच ईडीकडून सतीश उके यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सतीश उके यांच्या भावाने केला. पहाटे पाच वाजता ईडीने नागपूर येथील सतीश उके यांच्या घरी छापा टाकला. पाच तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ताब्यात घेतले होते.
ईडीचे अधिकारी घरातून बाहेर पडल्यानंतर सतीश उके यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. सकाळी साडेपाच वाजता ईडीचे अधिकारी सुरक्षारक्षकांचा फौजफाटा घेऊन आमच्या घरी आले. अधिकाऱ्यांनी आम्हा सर्वांचे मोबाईल फोन जप्त केले. फक्त मुलांना शाळेत जाऊन देण्याची मुभा होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सतीश उके आणि प्रदीप उके यांच्या खोलीची झडती घ्यायचे असल्याचे सांगितले. त्यांना काहीतरी कागदपत्रे हवी होती, असे उके यांच्या कुटुंबीयांनी म्हटले.

सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनेक केसेस केल्या होत्या. यापैकी एका प्रकरणाचा निकाल तीन ते चार दिवसांत लागणार आहे. गेल्याकाही दिवसांपासून आमच्या घराची रेकी सुरु होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केवळ सतीश उके यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. त्यामध्ये अनेक कागदपत्रे आहेत. भविष्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर होऊ शकणाऱ्या केसेस बघण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हा लॅपटॉप ताब्यात घेतला असावा. तसेच निमराळे हत्याकांड आणि न्या. लोया मृत्यूप्रकरणाविषयीही लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती होती, असा दावाही सतीश उके यांच्या भावाने केला.
लेखकाबद्दल
रोहित धामणस्कर
रोहित धामणस्कर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | लोकसत्ता, झी २४ तास, टीव्ही ९ मराठीसह डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ९ वर्षांचा अनुभव | सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख