म.टा. प्रतिनिधी, नागपूर
उपराजधानीत सोनसाखळी लुटीच्या घटना वाढल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी चार महिन्यांत सोनसाखळी लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोनसाखळी लुटीच्या घटना रोखून लुटारुंना हुडकून काढा, असे निर्देश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले. सोनसाखळी लुटीच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी सिव्हिल लाइन्समधील पोलिस जिमखाना येथे वरिष्ठ पोलिस अधिकारी व शहरातील सर्वच पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बैठक झाली. या बैठकीत पोलिस आयुक्तांनी हे निर्देश दिले.
लुटारुंना शोधण्यासाठी गुन्हे शाखा पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्याबाबतही चर्चा झाली. सोनसाखळी लुटारु कुठे आहेत, ते काय करीत आहेत, याची संपूर्ण माहिती घ्या, त्यांची वारंवार झाडाझडती घ्या, वारंवार घडत असलेल्या घटनांचे ठिकाण निश्चित करून तेथे पोलिसांची गस्त वाढवा, नाकाबंदी वाढवा, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सोनसाखळी लुटारुंचा शोध घ्या, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. जानेवारी ते १४ मे २०१८ पर्यंत सोनसाखळी लुटीच्या १५ घटना घडल्या. यावर्षी आतापर्यंत अशाप्रकारचे २५ गुन्हे दाखल झाले. जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये पाच, प्रतानगरमध्ये तीन, सीताबर्डी, धंतोली आणि लकडगंजमध्ये प्रत्येकी दोन गुन्हयांची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे आदींसह सर्वच पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त व पोलिस निरीक्षक बैठकीला उपस्थित होते.