अ‍ॅपशहर

जपा, निरोगी रहा...

गंमत म्हणजे आणखी एक प्रकारचा बहिरेपणा असतो जो आपल्या सगळ्यांना खूप छान जमतो! तो म्हणजे ‘डेफनेस ऑफ कन्व्हिनियन्स, अर्थात सोयीस्कर बहिरेपण! आपल्या मनासारखं नसेल तेव्हा आपण किती सोयीस्करपणे आणि सहज सांगतो नं, ‘मला ऐकू नाही आलं!’

Maharashtra Times 24 Jul 2017, 12:50 am
आपले कान... म्हणजे आपलं श्रवणेंद्रिय! किती बारीक-सारीक गोष्टींचे आवाज आपले कान टिपत असतात. आपल्या घरी कितीतरी लोक येत-जात असतात. आपण आतल्या खोलीत असलो आणि नियमितपणे आपल्याकडे येणारी व्यक्ती असली तर फक्त पायांच्या आवाजावरून आपण त्या व्यक्तीला ओळखतो. असे कितीतरी लहान मोठे आवाज आपले कान ग्रहण करत असतात. मात्र बरेचदा कानांमध्ये काहीतरी समस्या निर्माण होते आणि श्रवणाच्या समस्या सुरू होतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take care be getwell dr devendra mahore column
जपा, निरोगी रहा...


कमी ऐकू येणं किंवा बहिरेपण हे तीन प्रकारचं असतं. कंडक्टिव्ह, सेंसरी न्युरल आणि मिश्र. कंडक्टिव्ह म्हणजे आवाज वहनाची समस्या असते. बाह्यकर्ण आणि मध्यकर्ण यात असलेल्या नलिकेत समस्या असते. म्हणजे कानात मळ असतो किंवा पडद्याला छिद्र असतं किंवा कानाच्या हाडांच्या साखळीतलं एखादं हाड खराब होतं किंवा ती सखळी नीट राहात नाही म्हणून ऐकायला कमी येतं. आवाज नीट वाहून नेला जात नाही. कंडक्टिव्ह लॉस नीट करता येतो. ओटोस्क्लेरॉसिस हा एक रोग असतो. विशेषतः महिलांमध्ये आढळतो. या रोगात कानाचा पडदा नीट असतो, पण कानाच्या हाडाच्या साखळीतलं तिसरं हाड- स्टेपिस, त्याची हालचाल बंद होते म्हणून बहिरेपणा येतो. आवाज वहनाची समस्या असेल तर शस्त्रक्रिया करता येते. हाडाचं इम्प्लांट करता येतं. हे इम्प्लांट सायलॉस्टिक, टायटॅनियम किंवा सोन्याचं असतं. खराब झालेलं हाड काढून त्या ठिकाणी इम्प्लांट किंवा पिस्टन टाकून रुग्णाला छान ऐकू येतं. बहिरेपणा राहातच नाही.

सेंसरी न्युरल बहिरेपणात श्रवण ऱ्हास होतो. यात मेंदूला संदेश पाठवणारी नर्व्ह खराब होते. या दोषाचेही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे असा दोष जन्मजात असू शकतो किंवा काही कारणांमुळे उद्‍भवलेला असतो. जन्मजात दोष सामान्यपणे अनुवांशिक असतो. जन्मतःच मूल बहिरं असतं व त्यामुळे बोलणं विकसित होत नाही. अशावेळी श्रवणयंत्र देतात. लिप रीडिंग शिकवतात आणि गरज पडली तर कॉक्लियर इम्प्लांटही करता येतं. उद्‍भवलेल्या दोष, आघात किंवा डोक्याला जबरदस्त मार किंवा मोठ्या आवाजामुळे किंवा बरेचदा वयामुळे होत असतो. यासाठी श्रवणयंत्राशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

मिश्र प्रकारच्या श्रवण दोषात कंडक्टिव्ह आणि सेंसरी न्युरल या दोन्ही प्रकारच्या दोषाचा समावेश असतो. कानाचा बाहेरचा, मधला आणि आतला भाग याला इजा झाली किंवा बरेच दिवसांपासूण संसर्ग असेल किंवा ओटोस्क्लेरॉसिसच्या उत्तर भागातील टप्पे असतील किंवा मिनियर्स रोग इत्यादीमुळे मिश्र प्रकारचा श्रवण दोष उद्‍भवतो. यावर उपाय म्हणजे श्रवणयंत्र!

गंमत म्हणजे आणखी एक प्रकारचा बहिरेपणा असतो जो आपल्या सगळ्यांना खूप छान जमतो! तो म्हणजे ‘डेफनेस ऑफ कन्व्हिनियन्स, अर्थात सोयीस्कर बहिरेपण! आपल्या मनासारखं नसेल तेव्हा आपण किती सोयीस्करपणे आणि सहज सांगतो नं, ‘मला ऐकू नाही आलं!’ ते असो. असा सोयीनं आणि सोयीसाठी पत्करलेला बहिरेपणा असेल तोवर ठीक, नाहीतर वेळीच याकडे लक्ष द्यायला हवं.

मंडळी, हा शेवटला लेख. नाक-कान-घसा या त्रयीविषयी शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न या शृंखलेतून केला. तेव्हा या नाजूक अवयवांना जपा आणि निरोगी रहा!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज