अ‍ॅपशहर

दोन खलिस्तान समर्थकांना जामीन

म टा...

Maharashtra Times 17 Jul 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येस कारणीभूत असलेल्या खलिस्तान आंदोलनाचे समर्थन करणारा नारा देणारी गाडी शहरात फिरत असल्याने पोलिस तसेच गुप्तचर विभागातही एकच खळबळ उडाली. या प्रकरणी दोन आरोपींना अटकसुद्धा करण्यात आली. परंतु आरोपींचा उद्देश हिंसक नसून त्यांनी सहजच तो नारा लिहिला होता, तसेच हा नारा गाडीवरून काढून टाकण्यास तयार असल्याची खात्री दिल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.

'किंग कोबरा ऑर्गनायझेशन युथ फोर्स और राष्ट्र निर्माण' या संस्थेचे अध्यक्ष अरविंद कुमार रतुडी हे विविध सामाजिक तसेच शेतकरीप्रश्नांवर कार्यरत असतात. एका कामासाठी रतुडी हे त्यांच्या गाडीने ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे जात होते. यावेळी त्यांना सक्करदरा चौकात पांढऱ्या रंगाची एक पिकअप व्हॅन (एमएच४९-डी ९५) दिसली. या व्हॅनवर 'खलिस्तान जिंदाबाद' असा नारा नमूद होता तसेच काही बंदूकधारी सरदारांचे (पंजाबी) स्केचेस काढण्यात आले होते. 'शरीराच्या मृत्यूचे मला भय नाही, जाणिवांच्या मरणाची भीती मात्र खरी आहे', अशा आशयाचा एक नारा या गाडीवर लिहिण्यात आला होता. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने रतुडी यांनी पोलिस नियंत्रण कक्ष तसेच सक्करदरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांदीपन पवार यांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सक्करदरा पोलिसांनी ही जीप जप्त केली तसेच या जीपच्या मालकाला तसेच अन्य एका व्यक्तीला तत्काळ अटक केली.

न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, रविवारी या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपींचे वकील रोहित दीक्षित यांनी आरोपींच्या जामिनाकरिता अर्ज केला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने आरोपींची २ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटका केली.

.....

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज