अ‍ॅपशहर

मिठाई घेताय? पावती अवश्य मागा, नाहीतर...

आता सणांचे दिवस सुरू असल्याने मिठाईची खरेदीही वाढणार आहे. मात्र, या काळात ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

महाराष्ट्र टाइम्स 7 Oct 2020, 1:36 pm
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sweets


आता सणांचे दिवस सुरू असल्याने मिठाईची खरेदीही वाढणार आहे. मात्र, या काळात ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा आनंदाच्या प्रसंगात 'मूड ऑफ' होण्याची शक्यता असते. तेव्हा मिठाई खरेदी करताना त्याची पावती अवश्य घ्या, यात ग्राहकांची सुरक्षा आहे.

मिठाई घेताना तिची गुणवत्ता कशी आहे, हे तपासून पाहता येत नाही. ती दिसते कशी किंवा यापूर्वी घेतली होती, चांगली लागल्याने तीच द्या, असेच निकष खरेदी करताना अनेकदा लावले जाते. घेत असलेली मिठाई चवीला आवडली नाही तर परतीची तरतूद नसते. अनेक ठिकाणी बिलही दिले जात नाही. मात्र, मिठाई खराब निघाल्यास व पुढे संबंधित विक्रेत्यावर कारवाई व्हावी, असे वाटत असल्यात बिल घेणे आवश्यक आहे. आता मिठाई कधीपर्यंत वापरायची, याची तारीख टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे खुल्या मिठाईच्या ट्रेवरही तारीख टाकलेली दिसते. ज्या दुकानांमध्ये मालाचा उठाव अधिक असतो, शक्यतो अशा दुकानांमधून मिठाई किंवा खाद्यपदार्थ घ्यावे. कारण, त्यामुळे जुना माल ग्राहकांच्या माथी मारला जाण्याची शक्यता कमी असते. कुठलीही मिठाई ही खूप भडक रंगाची नसेल, त्याचप्रमाणे फरसाणमध्ये रंग वापरलेला नाही, याची खात्री करावी. फ्रीजची सोय असली तरी खाद्यपदार्थ शक्यतो त्याच दिवशी वापरायला हवे.

...तर विक्रेत्यांवर कारवाई!

नागपूर जिल्हा अतिरिक्त तक्रार निवारण आयोगाचे सदस्य अविनाश प्रभुणे म्हणाले की, आपल्याकडे पावती असेल तर आपण लढू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. त्याचप्रमााणे एखाद्या मिठाईची मुदत दोन-तीन दिवसांत संपत असेल तर ती शक्यतो घेणे टाळले पाहिजे. काळजी घेऊनही मिठाई खराब निघाली तर अन्न व औषध प्रशासन कार्यालयात तक्रार करता येते. अशी तक्रार केल्यावर विक्रेत्यावर कारवाई होते. मात्र, ग्राहकाला जो आर्थिक, शारीरिक, मानसिक मन:स्ताप झालेला असतो त्याची भरपाई होत नाही. यासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे सर्व पुराव्यांसह दाद मागता येते, असेही प्रभुणे यांनी स्पष्ट केले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज