अ‍ॅपशहर

​ विहिरी कोरड्या, तरीही म्हणे टंचाई नाही!

जिल्हा मुख्यालयापासून २७० किमी अंतरावरील पुल्लीगुडम हे आदिवासीबहुल गाव. वीज, रस्ता नसलेल्या या गावात पाण्यासाठी कायम पायपीट करावी लागते. गावाची तहान भागविण्यासाठी एक विहीर खोदण्यात आली आहे. ती फुटक्या अवस्थेत असल्याने महिलांना विहिरीत उतरून पाणी घ्यावे लागते. ‌विहिरीनेही आता तळ गाठला आहे. हातपंप बंद अवस्थेत आहे. लगतच्या कोपेल्यातही हीच परिस्थिती आहे. एकच विहिरी असल्याने अवघा गाव पाण्यासाठी एकवटतो. गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य गावांमध्ये याहून वेगळी परिस्थिती नाही. पण, पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई नसल्याचा कागदोपत्री अहवाल सादर केला आहे.

Maharashtra Times 27 Apr 2017, 4:23 am
महेश तिवारी, गडचिरोली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water shortage in trible area
​ विहिरी कोरड्या, तरीही म्हणे टंचाई नाही!

जिल्हा मुख्यालयापासून २७० किमी अंतरावरील पुल्लीगुडम हे आदिवासीबहुल गाव. वीज, रस्ता नसलेल्या या गावात पाण्यासाठी कायम पायपीट करावी लागते. गावाची तहान भागविण्यासाठी एक विहीर खोदण्यात आली आहे. ती फुटक्या अवस्थेत असल्याने महिलांना विहिरीत उतरून पाणी घ्यावे लागते. ‌विहिरीनेही आता तळ गाठला आहे. हातपंप बंद अवस्थेत आहे. लगतच्या कोपेल्यातही हीच परिस्थिती आहे. एकच विहिरी असल्याने अवघा गाव पाण्यासाठी एकवटतो. गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य गावांमध्ये याहून वेगळी परिस्थिती नाही. पण, पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई नसल्याचा कागदोपत्री अहवाल सादर केला आहे.

कोपेला येथील विहिरीने तळ गाठल्याने हातपंपाचा आधार उरला. पण, त्यातून लाल रंगाचे दूषित पाणी येत असल्याने गावकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या दोन्ही गावांत नव्याने विहिरींचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराने अजूनही काम सुरू झाले नाही. पाणीटंचा कायम आहे. सिंरोंचा तालुक्यातील चिटूर येथे फेब्रुवारीतच विहिरीचे पाणी आटल्याने नाल्यातील पाणी आणून गावकरी तहान भागवित आहेत. पल्लीगुडम, कोपेला, चिटूर ही तिन्ही गावे जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २०० किमी अंतरावरील आहेत. लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारीही या गावांकडे फिरकत नसल्याने अडचणी कायम आहेत. त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यात पाणीटंचाई नसल्याचा दावा केला आहे.
एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या चार तालुक्यांत गावातील पाणवठे आटल्याने नाल्यावरून पाणी आणले जात आहे. आदिवासी गावांमध्ये विहिरींची संख्या कमी आहे. दुसरा पर्याय हातपंपाचा उरत असला तरी अनेक गावांमध्ये हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. वारंवार मागणी करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रशासनाकडे जिल्हाभरात ६० हातपंप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती देण्यात येत असले तरी ही संख्या याहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

शुद्धिकरणाविनाच पाणीपुरवठा
आष्टी आणि कुरुड या दोन गावांसह चामोर्शी, अहेरी, आरमोरी आणि भामरागड येथे फिल्टर प्लान्ट असून उर्वरित ठिकाणी नदीतून आलेले पाणी शुद्धिकरण न करताच नागरिकांपर्यंत पोहचविले जात आहे. या गावांलगत नळयोजना जुनाट आहेत. मोटरपंपात बिघाड आल्यास चार दिवसांपर्यंत पाणीपुरवठा बंद असतो. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मोजक्याच गावांत आहेत.

दृष्टिक्षेपात...
एटापल्ली आणि सिरोंचा येथील हातपंप मेकॅनिकचे पद रिक्त आहे.
विजेचे बिल न भरल्याने १८ नळयोजना बंद अवस्थेत
बहुतांश ठिकाणी फिल्टर प्लांट नाही
१२ विंधन विहिरींची मागणी
सिरोंचा तालुक्यातील पाच गावांत ट्युबवेलची मागणी
सहाय्यक भूवैज्ञानिकाचे पद २०१५पासून रिक्त
(समाप्त)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज