अ‍ॅपशहर

Weather Alert : राज्यावर पुन्हा आस्मानी संकट; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना हवामानाचा इशारा

२१ मार्च दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2022, 1:56 pm
नागपूर : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना आता पुन्हा एकदा हवामानाने यू-टर्न घेतला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम अनेक जिल्ह्यांवर पाहायला मिळत आहे. रविवारनंतर आज सोमवारीही अनेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानामुळे पुन्हा एकदा पिकांवरही याचा परिणाम पाहायला मिळेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weather today at my location
weather today at my loction


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत कुलाबा, सांताक्रूझ, नाशिक, कोल्हापूर, परभणी, पुणे या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पुढच्या काही तासांमध्ये पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पुढच्या १२ तासांमध्ये चक्रीवादळात रुपांतर

गेल्या दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे रूपांतरण चक्रीवादळात झाले आहे. तसेच उत्तरेकडेसुद्धा वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्याचा परिणाम पूर्व आणि उत्तरेकडील राज्यांवर झाला आहे. तर पुढच्या १२ तासांमध्ये या वादळाचं रुपांतर चक्रीवादळात होईल असा इशारा देण्यात आला आहे.

खरंतर, देशातील अनेक राज्यांमध्ये रविवारी वादळी पावसासह गारपिटीचीही हजेरी लागली आहे. यात विदर्भातसुद्धा काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, रविवारी वादळी पावसाची नोंद झाली नाही. तरीसुद्धा नागपूर शहर तसेच अन्य जिल्ह्यांमधील वातावरणात काहीसे बदल जाणवले. त्यामुळे पाऱ्यात किंचित घसरण झाली. विदर्भात अकोल्याखेरीज वाशीम येथे ४१.५, वर्धा येथे ४० आणि चंद्रपूर येथे ४०.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. इतर सर्वच जिल्ह्यांमधील तापमान चाळीस अंशांपेक्षा कमी होते.

पुण्याचा विमानतळप्रश्न लवकरच मार्गी; जागा निश्चित झाल्याची शरद पवार यांची माहिती
मुंबईमध्येही ढगाळ वातावरण

मुंबईमध्येही आज सकाळपासून पावसाळी, ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारच्या सुमारास काही ठिकाणी पावसाळ्याप्रमाणे वाऱ्यांचाही अनुभव मुंबईकरांनी घेतला. १ मार्चपासून चढता असलेला तापमानाचा पारा या वाऱ्यांमुळे खाली आला. मुंबईत सांताक्रूझ येथे ३१.७, तर कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मुंबईसह कोकण विभागात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातही शनिवारच्या तुलनेत तापमानात घट नोंदली गेली. मध्य महाराष्ट्रात शनिवारच्या तुलनेत रविवारच्या कमाल तापमानात काही ठिकाणी २.५ ते ३.५ अंश सेल्सिअस घट नोंदली गेली.

'२२ आणि २३ मार्चला पावसाचा अंदाज'

कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी २२ आणि २३ मार्चला पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे यांनी वर्तवला आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडे असेल. रविवारी मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर येथे २.६, महाबळेश्वर येथे २.३, नाशिक येथे ३.७, सातारा येथे ३.५, तर सांगली येथे २.३ अंशांनी शनिवारच्या तुलनेत कमाल तापमानाचा पारा उतरला होता. कोल्हापूर येथे सरासरीपेक्षा २.५ अंशांनी, सांगली येथे सरासरीपेक्षा १.१ अंशांनी, तर महाबळेश्वर येथे सरासरीपेक्षा १.९ अंशांनी कमाल तापमान रविवारी कमी नोंदले गेले. उर्वरित राज्यात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमान अधिक आहे. राज्यात रविवारीही विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी शनिवारपेक्षा रविवारच्या कमाल तापमानात किचिंत घट नोंदली गेली.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज