अ‍ॅपशहर

झोटींग समिती ओलांडतेय कक्षा

भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन व्यवहाराच्या चौकशीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या न्या. दिनकर झोटींग या एकसदस्यीय समितीने सरकारने निर्धारित केलेली कक्षा ओलांडल्याचा दावा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला.

Maharashtra Times 28 Feb 2017, 8:50 am
खडसे यांचा आरोप, एमआयडीसीचा आक्षेप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम zoting committee is crossing the limit claims eknath khadse
झोटींग समिती ओलांडतेय कक्षा


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन व्यवहाराच्या चौकशीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या न्या. दिनकर झोटींग या एकसदस्यीय समितीने सरकारने निर्धारित केलेली कक्षा ओलांडल्याचा दावा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला. मात्र, खडसे यांना अशाप्रकारचा दावा करण्याचा अधिकारच नाही, असा आक्षेप एमआयडीसीने घेतला आहे.

राज्य सरकारने २३ जून २०१६ रोजी अध्यादेश काढून झोटींग समितीची कार्यकक्षा निर्धारित केली होती. त्यात भोसरी येथील उकानी यांची जमीन एमआयडीसीने अधिकृत संपादित केली होती काय, ती जमीन हस्तांतरणीय होती काय, व्यवहारात खडसे यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत काय, असे मुद्दे नमूद केले होते.

दरम्यान, खडसे यांनी सादर केलेल्या अर्जात चौकशी समितीने निर्धारित केलेल्या कक्षा ओलांडल्याचा दावा करत समितीने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यांची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी केली. खडसे यांच्या अर्जावर एमआयडीसीच्या वतीने बाजू मांडताना अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी आक्षेप घेतला. खडसे समितीसमोर आरोपी आहेत, त्यामुळे त्यांना समितीच्या कक्षा फेरनिर्धारण करण्याची मागणी करण्याचा अधिकारच नाही. तसेच समितीने कोणत्याही कार्यकक्षा ओलांडलेल्या नाहीत. उलट चौकशी सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकारने निर्धारित केलेल्या विस्तारित मुद्द्यांना लहानलहान भागांत विभाजित केले आहे. तर जमीन हस्तांतरणाच्या मुद्द्यावर जमिनीचा मूळ मालक कोण, भूसंपादन वैध होते काय, जमिनीवरील मालकी हक्क वैध होता काय, तसेच त्या जमिनीच्या खरेदी-विक्रीत खडसे यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत काय, खडसे यांचा घोटाळ्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असे मुद्दे घेतले आहेत. ते सर्व मुद्दे सरकारने निर्धारित केलेल्या कार्यकक्षेतीलच आहेत, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले.

दरम्यान, खडसे यांनी भोसरी जमिनीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची १२ एप्रिल २०१६ रोजी बैठक आयोजित करून त्यांचे या प्रकरणाशी हितसंबंध गुंतलेले आहेत ते स्पष्ट होते, असा दावा एमआयडीसीने केला आहे. न्या. झोटींग यांनी खडसे यांना काही प्रश्न विचारले. आज, मंगळवारीदेखील झोटींग हे खडसेंना चौकशीच्या अनुषंगाने काही मुद्दे विचारणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज