अ‍ॅपशहर

महाराष्ट्र हादरला! २३ वर्षीय तरुणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, प्रेमसंबंधातून घरच्यांनीच संपवले

Nanded Murder Case: नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. २३ वर्षांच्या डॉक्टर तरुणीला तिच्या घरच्यांनीच संपवल्यांचं समोर आलं आहे.

| Edited byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jan 2023, 12:21 pm
नांदेडः प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशीच नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका २३ वर्षीय मुलीची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्याच लेकीचा गळा आवळून तिची निष्ठुरपणे हत्या केली आहे. एवढंच नाही तर तिचा मृतदेह परस्पर जाळला असून तिची राख जवळच्याच ओढ्यातही फेकून दिली. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nanded girl murder


नांदेडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आपल्या मुलीची हत्या केली आहे. शुभांगी जोगदंड असं मयत मुलीचं नाव असून ती २३ वर्षांची आहे. शुभांगी बीएएमसमध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरूणासोबत तिचे प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हते. कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरे एक स्थळ पाहून तिचे लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने आठच दिवसात हे लग्न मोडायला भाग पाडलं. त्यामुळे गावात बदनामी झाली.

वाचाः धक्कादायक! नांदेडमध्ये वडील आणि भावांनी तरुणीला संपवलं, मृतदेह जाळून राख हवेत उधळली

गावात बदनामी झाल्यामुळं कुटुंबीय नाराज होते. त्यामुळं रागाच्या भरात तिचा खून केल्याची कबुली कुटुंबियांनी दिली. रविवारी रात्री म्हणजेच २२ जानेवारी रोजी शुभांगीची कुटुंबियांनी हत्या केली. तिचा मृतदेह शेतातच जाळला. तसंच बाजूच्याच ओढ्यात ती राख टाकून दिली.

वाचाः पोलिसांच्या हाती लागली गोपनीय माहिती, हॉटेलमध्ये धाड टाकताच सापडलं मोठं घबाड

तीन दिवसांपासून बेपत्ता

शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यामुळे मित्र- मैत्रिणींमध्ये चर्चा सुरु झाली. शुभांगी नेमकी कुठे हरवली, याची शोधाशोध सुरु झाली. गुप्त बातमीदाराने यासंबंधी पोलिसांकडे माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता तेव्हा हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, मामा, भाऊ आणि काकांची दोन मुलं अशा पाच जणांना अटक केली आहे.

वाचाः पुणेकर तरुणाचा प्रताप, स्वतःच्याच बंगल्याला अन् गाडीला आग लावली; नंतर तमाशाला जाऊन बसला

महत्वाचे लेख