अ‍ॅपशहर

वर्षात दुसऱ्यांदा डिलिव्हरीला का आली? मुजोर नर्सने महिलेला झापले, आता आयोगाच्या एन्ट्रीने रुग्णालयाचे धाबे दणाणले

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला सिझरींगचे साहित्य नसल्याचे सांगून हाकलण्यात आले. आता या प्रकरणी अल्पसंख्यांक आयोगाने दखल घेऊन सुनावणी लावल्यानंतर रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 4 Feb 2022, 8:02 am
नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला सिझरींगचे साहित्य नसल्याचे सांगून हाकलण्यात आले. आता या प्रकरणी अल्पसंख्यांक आयोगाने दखल घेऊन सुनावणी लावल्यानंतर रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra nanded vishnupuri government medical hospital
नांदेड विष्णुपुरी शासकीय रुग्णालय


नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत हीना बेगम ही महिला दाखल झाली होती. पण या अत्यवस्थ महिलेला सिझरिंगचे साहित्य नसल्याचे सांगून चक्क बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सिझरचे साहित्य धुण्याचे मशीन खराब झाले आहे. त्यामुळे थांबावे लागेल. पण महिलेचे दुसरे सिझर असल्याने तोपर्यंत गर्भपिशवी फाटून मुल आणि आईच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल करा, असे सांगून महिलेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 18 ऑक्टोबर रोजी हा संपूर्ण प्रकार सदर महिलेच्या आईने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाची तक्रार केली पण दखल घेतली गेली नसल्याने अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. आयोगाने या प्रकरणी 15 दिवसात कारवाई करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यावरही कारवाई न केल्याने आयोगाने 4 फेब्रुवारी रोजी थेट सुनावणी ठेवली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने 2 फेब्रुवारी रोजी घाई गडबडीत चौकशीचे सोपस्कार पूर्ण केले. ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य धुण्यासाठी लागणारे मशीन खराब झाल्याने हा प्रकार घडल्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले. दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नांदेडचे शासकीय रुग्णालय मल्टी स्पेशालिटी रुग्णालय असून सर्व अत्याधुनिक सुविधा इथे आहेत. दररोज 10 ते 15 सिझर आणि 40 ते 50 नॉर्मल प्रसूती इथे होतात. अश्या मोठ्या रुग्णालयात ऑपरेशन साठी लागणारे साहित्य धुण्याचे मशीन खराब झाल्यामुळे अत्यवस्थ महिलेला बाहेरचा रस्ता दाखवणे ही गंभीर बाब आहे. आता दोषी डॉक्टरांवर कारवाई होते हे पाहावे लागणार आहे.

महत्वाचे लेख