नांदेड : ईद हा मुस्लिम बांधवांचा आनंदाचा सण. या दिवशी शीरखुर्मा तसेच अनेक गोड-धोड पदार्थ खाऊन सण साजरा करण्याचा दिवस असूनही नांदेड शहरातील हॅप्पी क्लबच्या मुस्लिम तरुणांनी स्मशानभूमीत करोनाने मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून एक आगळा-वेगळा आदर्श घालून दिला आहे. या तरुणांनी आजपर्यंत सर्वधर्मीय करोना मृतांचे अंत्यसंस्कार केले आहेत.
करोना काळात जिथे रक्ताचे नाते ओळख दाखवत नाही, जवळ येत नाही अशी अनेक उदाहरणे आहेत. अशात हॅप्पी क्लब सगळ्यांसमोर माणुसकीचा आदर्श ठेवत आहेत. सामाजिक सलोख्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण असू शकत नाही.
आज रमजान ईद असतानाही ईद साजरी करून हे तरुण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत सेवा करत आहेत. देशात हिंदू-मुस्लिम असा वाद असला तरी माणुसकीपेक्षा कुठलाही धर्म नाही हेच यातून स्पष्ट होतं.