अ‍ॅपशहर

जिल्ह्यातील १२८ शाळांना ‘आयएसओ’

जिल्ह्यातील १२८ शाळांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या १२८ शाळांना आयएसओचे मानांकन प्राप्त झाले असून, इतर शाळांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.

अश्विनी कावळे | Maharashtra Times 12 Dec 2017, 4:00 am
नाशिक : ग्रामीण भागातील शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा, सुविधांचा प्रश्न याविषयी उलटसुलट चर्चा रंगत असतात. मात्र या चर्चांना छेद देत जिल्ह्यातील १२८ शाळांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या १२८ शाळांना आयएसओचे मानांकन प्राप्त झाले असून, इतर शाळांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. चांदवड तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४७ शाळांचा यात समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 128 schools have iso
जिल्ह्यातील १२८ शाळांना ‘आयएसओ’


इंगजी शाळांकडे वाढत्या ओढीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपुढे मोठे आव्हान उभे आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना इतरही सुविधांची उपलब्धता असल्याने विद्यार्थिसंख्या साहजिकच या शाळांकडे वळण्यास प्राधान्य देत आहे. नुकतेच राज्य शिक्षण विभागाने पटसंख्येचा अभाव असलेल्या १३०० शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिकमधील ३१ शाळांचा यात समावेश आहे. एकीकडे अशा परिस्थितीत शाळा बंद करण्यात येत असल्याचे व दुसरीकडे आयएसओ मानांकनावरून त्यांचा उत्कृष्ट दर्जा पुढे येत आहे. डिजिटल क्लासरूम, सौरऊर्जा वापर, इन्व्हर्टर सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा, प्रथमोपचार पेटी, शालेय रेकॉर्ड, जुने रेकॉर्ड मांडणी, ग्रामस्थांचा सहभाग, खिडक्यांना पडदे, स्वच्छता व टापटीपपणा, वर्गांमधील प्रकाशयोजना, वाचनालय यांसारख्या सुमारे ५० निकषांची पूर्तता करून या शाळा आयएसओ मानांकनाच्या पातळीत यशस्वी ठरल्या आहेत.

तालुकानिहाय ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शाळा

देवळा ः १४, सिन्नर ः ०३, कळवण ः ०१, चांदवड ः ४७, निफाड ः ०५, नांदगाव ः ०२, दिंडोरी ः ०४, त्र्यंबकेश्वर ः ०२, इगतपुरी ः ०४, मालेगाव ः ०४, पेठ ः १०, सुरगाणा ः ०१, नाशिक ः २३, येवला ः ०२, सटाणा ः ०६.

पटसंख्यावाढीस फायदा

दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब या जिल्हा परिषदेच्या शाळेत असुविधांमुळे विद्यार्थी इतर खासगी शाळांना प्राधान्य देत असल्याचे चित्र काही वर्षांपासून होते. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शिक्षकांच्या मदतीने ही शाळा सध्या डिजिटल स्कूल म्हणून आता ओळखली जात आहे. या शाळेने आयएसओ मानांकनदेखील शाळेने पटकावले आहे. याचा लाभ शाळेच्या पटसंख्यावाढीसही होत असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यातील इतर शाळांनाही आयएसओ मानांकनाविषयी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र, बीट, तालुकास्तरावर शाळांना मार्गदर्शन केले जात आहे. ज्या शाळा आयएसओ आहेत, त्या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांचे अनुभवकथन, डिजिटल शाळा याविषयी इतर शाळांना मार्गदर्शन केले जात आहे.

- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी (प्रभारी), जिल्हा परिषद (प्राथमिक)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज