अ‍ॅपशहर

अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त

महापालिकेने काही दिवसांपासून अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत सोमवारी उत्तमनगर व पाथर्डी फाटा येथील तीन अनधिकृत होर्डिंग्ज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आली.

Maharashtra Times 18 Jul 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम action against encroachment in cidco
अनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त


महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत सोमवारी उत्तमनगर व पाथर्डी फाटा येथील तीन अनधिकृत होर्डिंग्ज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आली.

महापालिकेच्या वतीने होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी आवश्यक ती परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र, शहरात अनेक होर्डिंग्ज हे विनापरवाना असल्याचे लक्षात आल्याने महापालिकेने हे होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी उत्तमनगर येथील अनधिकृत लोखंडी स्ट्रक्चर असलेले होर्डिंग हटविण्यात आले, तर पाथर्डी फाटा येथील दोन अनधिकृत लोखंडी स्ट्रक्चर असलेले होर्डिंग्ज हटविण्यात आले. यावेळी या होर्डिंग्जसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.

दोन अतिक्रमण निर्मूलन पथकांनी जेसीबी व गॅस कटरच्या सहाय्याने ही होर्डिंग्ज जमीनदोस्त केली. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाली. ही मोहीम आयुक्त अभिषेक कृष्णा व किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या सूचनेप्रमाणे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी राबविली. महापालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेचे स्वागत होत असले, तरी सिडकोसारख्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांबाबत महापालिका केव्हा पुढाकार घेणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

--

...तर कोणत्याही क्षणी कारवाई

महापालिकेने यापूर्वीच अनधिकृत होर्डिंग्ज उभारणीबाबत दंडात्मक कारवाईच्या नोटिसा दिलेल्या आहेत. दंडात्मक रक्कम भरून होर्डिंग्जसाठी नियमानुसार परवानगी घ्यावी अन्यथा महापालिका संबंधितांचे अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई कोणत्याही क्षणी करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या, तसेच पार्किंगच्या व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांना त्यांची बेकायदेशीर व अतिक्रमित असलेली बांधकामे काढून घेण्याबाबतही यावेळी आवाहन करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज