अ‍ॅपशहर

आवाज दाबण्याचा प्रयत्न

'सनातन हिंदू धर्म' या नावाच्या यू-ट्यूब चॅनलवरून एका व्हिडीओद्वारे विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री व गोरक्षक मच्छिंद्र शिर्के तसेच हिंदू आश्रम मुंबईचे आचार्य जितेंद्र महाराज यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Maharashtra Times 12 Feb 2018, 4:00 am
ठार मारण्याच्या धमकीप्रकरणी आमदार आसिफ शेख यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम malegaon news


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

'सनातन हिंदू धर्म' या नावाच्या यू-ट्यूब चॅनलवरून एका व्हिडीओद्वारे विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री व गोरक्षक मच्छिंद्र शिर्के तसेच हिंदू आश्रम मुंबईचे आचार्य जितेंद्र महाराज यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच माझ्यावर आतंकवादी आमदार, माफिया डॉन असल्याचे केलेले आरोप बिनबुडाचे आहे. काही जातीयवादी संघटना माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र मी यामुळे घाबरून जाणार नसून, याविरोधात आवाज उठवणार असल्याचे स्पष्टीकरण आमदार अशिफ शेख यांनी दिली आहे

यू-ट्यूबवरील एका व्हिडीआद्वारे शुक्रवारी (दि. ९) शिर्के व आचार्य जितेंद्र यांनी आमदार शेख यांना जीवे मारण्याची धमकी देत रोहिंग्या मुस्लिम, गोवंश हत्या अशा विविध मुद्द्यांवरून त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर येथील आयेशानगर पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणावर आमदार शेख यांनी रविवारी (दि. ११) उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

या वेळी शहर काँग्रेसचे प्रवक्ता साबीर गौहर, नगरसेवक अस्लम अन्सारी, लतीफ बागवान, फारुख कुरेशी, अनिस अजहर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलताना आमदार शेख यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडण करित माझा कुठल्याही गुन्हेगारी माफियाशी संबंध नाही. येथील जनतेला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भडवण्याचा, दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा, कसायांना हाताशी धरून गोवंशाची कत्तल घडवण्याचे कृत्य मी केलेले नसल्याचे म्हणत आरोप चुकीचे असल्याचे आमदार शेख म्हणाले. गोवंश हत्या कायद्याचे पालन झालेच पाहिजे. मात्र शिर्के यांच्याकडून या कायद्याच्या आडून शहरातील दोन समाजात तेढ निर्माण केला जातो आहे. त्यांचा गो-रक्षणाशी कुठलाही संबध नाही, असे प्रतिज्ञापत्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे शिर्के हे बोगस गोरक्षक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

माझ्यावरील आरोप चुकीचे

ब्रम्हदेशात होत असलेल्या मुस्लिमांवरील अत्याचाराबाबत मानवतावादी भूमिकेतून केंद्राने परवानगी दिली तर शहरात आश्रय देऊ, असे वक्तव्य केले होते. मात्र त्या विधानाचा विपर्यास करून माझ्यावर आतंकवादी असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम आरक्षणाची लढाई सनदशीर मार्गाने लढत असून, त्यासाठी मुस्लिम बांधवांना भडकवण्याचा प्रश्नच येत नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

१६ फेब्रुवारीला आंदोलन

या सर्व प्रकरणाबाबत आपण पोलिसात तक्रार केली असून, स्वतः कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. या धमकी प्रकरणाने माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे आमदार शेख म्हणाले. सरकारने मला संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच येत्या १६ फेब्रुवारीला येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी देशाच्या व राज्याच्या पोलिस यंत्रणेला आव्हान दिले आहे. यामागे 'सनातन', 'अभिनव भारत' यांसारख्या जातीयवादी संघटना असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच येत्या २० फेब्रुवारी रोजी आपण मुंबईत असू, त्यांनी माझ्यावर हल्ला करावाच असे खुले आव्हानदेखील दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज