अ‍ॅपशहर

निरीक्षण गृहातून पुन्हा पळाली मुले

उंटवाडी परिसरातील बालनिरीक्षण गृहातून सोमवारी मध्यरात्री नऊ मुले खिडकीचे गज वाकवून पळून गेली.

Maharashtra Times 17 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम boys ran away from remand home
निरीक्षण गृहातून पुन्हा पळाली मुले


उंटवाडी परिसरातील बालनिरीक्षण गृहातून सोमवारी मध्यरात्री नऊ मुले खिडकीचे गज वाकवून पळून गेली. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. या नऊ जणांमध्ये जून महिन्यात पळून गेलेल्या मात्र नंतर पुन्हा शोधून ताब्यात घेतल्या गेलेल्या पाच मुलांचाही समावेश आहे. अवघ्या अडीच महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मुले पळून जाण्याची ही दुसरी घटना आहे.

उंटवाडी परिसरात बाल निरीक्षण गृहात सध्या अनाथ आणि गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणारी दोन वर्गातील साधारणत: १४ ते १८ वयोगटातील मुले आहेत. सोमवारी मध्यरात्री पळालेल्या नऊ जणांपैकी ८ जण नाशिकमधील तर एक जण मालेगावचा रहिवासी आहे. पळालेल्या मुलांपैकी काही जणांवर खुनाचा प्रयत्न, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचाही आरोप आहे. या नऊ मुलांपैकी ५ जण ७ जूनच्या घटनेत या पूर्वीही पळाले होते. त्यांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेण्यात यश मिळविले होते.

याबाबत निरीक्षण गृहाचे सचिव चंदूलाल शाह यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निरीक्षणगृहास समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती आहे. रात्री सर्व जण झोपी गेल्यानंतर या मुलांनी खिडकीचे गज वाकविण्यात यश मिळविले. सद्यस्थितीत येथे ८० मुले आणि मुली आहेत. येथे दाखल सर्व मुली या अनाथ असल्याने त्यांचा सांभाळ करणे तितकेसे आव्हानात्मक नाही. मात्र, दाखल मुलांपैकी काहींना गुन्हेगारी घटनांची पार्श्वभूमी असल्याने पुरेशा मनुष्यबळाशिवाय त्यांच्यावर देखरेख ठेवणे तितकेसे सोपे ठरत नाही.

यासारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केअर टेकर्सची संख्या पुरेशा प्रमाणात वाढवावी, या मागणीचे पत्रही राज्य बालकल्याण विभागास निरीक्षणगृहाने पत्र लिहीले आहे. आतापर्यंत या मागणीवर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आता चार जणांची संख्या येथे मंजूर असताना केवळ दोन केअर टेकर येथील केंद्रात आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज