अ‍ॅपशहर

नदीशी तुटलेलं नातं जोडणारा गोदाप्रेमी

पाणवेलींच्या विळख्यात तीन म्हशी बुडून मेल्यानंतर गोदेच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. गोदावरी नदीपात्रात पाणी कमी, तर सांडपाणीच अधिक वाहतेय, हे वास्तव समोर आल्यानंतर ते हळहळले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2019, 11:15 am
Mahesh.pathade @timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम godavari


नाशिक : पाणवेलींच्या विळख्यात तीन म्हशी बुडून मेल्यानंतर गोदेच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. गोदावरी नदीपात्रात पाणी कमी, तर सांडपाणीच अधिक वाहतेय, हे वास्तव समोर आल्यानंतर ते हळहळले. ज्या नदीकडे सन्मान, आदराने पाहिले जाते, त्या नदीचे एक प्रकारे शोषणच सुरू आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्या शुद्धीकरणाचा वसा घेतला. त्यासाठी त्यांनी प्रदीर्घ न्यायालयीन लढा लढला आणि नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोर्टाने पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश दिले. भारतात प्रथमच नदीला पोलिस संरक्षण मिळवून देणारे हे पर्यावरणप्रेमी आहेत, नमामि गंगे फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित.

‘नमामि गंगे’ या चळवळीने आता व्यापक स्वरूप धारण केले असून, गोदावरी प्रदूषणासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी पंडित सातत्याने प्रयत्नशील असतात. गोदावरी नदी प्रवाही असेल तर जैवविविधता टिकवता येते. मात्र, हा प्रवाह धरणनियंत्रित राहिल्याने गोदावरी गुदमरत असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी नाशिक महापालिकेचे लक्ष वेधले. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी प्रशासनाविरुद्ध जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली. हा भारताच्या इतिहासातला पहिलाच खटला होता, ज्यात मिस्चिफ कायद्याचा उल्लेख होता. हा खटला अद्याप सुरूच आहे. त्यानंतर पंडित यांचा जल संरक्षक राजेंद्र सिंह यांच्याशी परिचय आला. त्यांच्या सल्ल्यानुसार पंडित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका होती गंगापूर धरण ते नांदूरमध्यमेश्वर धरण यांच्या दरम्यान वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबतची. यात कोर्टाने ‘नीरी’ला नदी प्रदूषणावर अहवाल सादर करण्यास सांगितले. इथूनच राजेश पंडित यांच्या नदी स्वच्छता चळवळीला खऱ्या अर्थाने बळ मिळाले .

राष्ट्रीय गोदाऐक्य
गोदेच्या प्रवासातील सर्व राज्यांतील पर्यावरणप्रेमींना एकत्र आणून गोदावरी स्वच्छतेची चळवळ देशव्यापी करण्यासाठी राजेश पंडित काम करीत आहेत. लवकरच राष्ट्रीय स्तरावर एक परिषद आयोजित करण्यात येणार असून, त्यात गोदावरीचे प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहेत. याच परिषदेत गोदावरी गीत सादर करण्यात येणार आहे. हे गीत शंकर महादेवन यांनी गायलेले आहे. पूर्वीपासून नदीबाबत सन्मानाचा भाव होता, तो आता उपभोगाचा भाव झाला आहे. त्यामुळे नदीशी तुटलेले नाते जोडण्याचे काम नमामि गंगा फाउंडेशन करीत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज