अ‍ॅपशहर

'बिटको' कात टाकतेय

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बिटको रुग्णालयाची झाडाझडती घेतल्यानंतर जवळपास आठवडाभरा कालावधी उलटल्यानंतर बिटको रुग्णालयातील चित्र काही प्रमाणात बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये बिटको रुग्णालयाच्या बदलणाऱ्या चेहऱ्याने रुग्णसेवेचा दर्जा नक्कीच उंचावणार आहे.

Maharashtra Times 10 Mar 2018, 9:29 pm
आयुक्तांच्या दौऱ्यानंतर रुग्णालयात चित्र पालटले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम changing the face of bitco hospital in nashik by municipal corporation health department
'बिटको' कात टाकतेय


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बिटको रुग्णालयाची झाडाझडती घेतल्यानंतर जवळपास आठवडाभरा कालावधी उलटल्यानंतर बिटको रुग्णालयातील चित्र काही प्रमाणात बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये बिटको रुग्णालयाच्या बदलणाऱ्या चेहऱ्याने रुग्णसेवेचा दर्जा नक्कीच उंचावणार आहे.

या रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असून, बिटको रुग्णालयाचे रुपडे काही प्रमाणात बदलले आहे. सकाळच्या ओपीडीवरील ताण कमी करण्यासाठी आता सायंकाळची ओपीडीही महापालिका प्रशासनाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या बिटको रुग्णालयाला अचानक भेट दिली होती. या भेटीत त्यांनी या रुग्णालयाच्या स्वच्छतेसह, वीज व्यवस्था, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, कर्मचाऱ्यांचे कामकाज यांसह विविध सुविधांची तपासणी केली होती. यातील बहुतांश सुविधांत त्यांना अनियमितता आढळून आल्याने त्यांनी उपस्थित सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली होती.

व्यवस्थापनाला जाग

या रुग्णालयातील व्यवस्था सुधारण्याची तंबीही त्यांनी दिली होती. महापालिका आयुक्तांच्या झाडाझडतीने जागी झालेल्या स्वच्छता, वीज, पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवडाभरात येथील व्यवस्था काही प्रमाणात बदलण्याचा प्रयत्न केला आहे. रुग्णालयातील बहुतांश वॉर्ड आणि जिन्यांतील अस्वच्छता दूर करण्यात आली आहे. तसेच येथील वीजपुरवठा विभागानेही या रुग्णालयातील विजेचे दिवे व वायरिंगच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याचे दिसून आले आहे.

कर्मचाऱ्यांना सूचना

बिटको रुग्णालयातील काही विभागांतील कर्मचाऱ्यांकडून रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना सहकार्याची वागणूक मिळत नसल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. त्याची दखल घेत रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना सहकार्य करण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी स्वतः रुग्णालयाला भेट दिली. यावेळी बोर्डे यांनी रुग्णालयातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याठिकाणी रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

बिटको रुग्णालयाची पालिका आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करून रुग्णसेवेचा दर्जा वाढविण्याबाबत आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार या रुग्णालयातील बहुतेक कामे पूर्ण होत आलेली आहेत. सकाळप्रमाणे दुपारीही चार ते सहा वाजेपर्यंत ओपीडी सुरू करण्याचे आदेशही रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.

-किशोर बोर्डे, अतिरिक्त आयुक्त, मनपा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज