अ‍ॅपशहर

मापात पाप करणाऱ्यांना चाप

मापात पाप करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी वैद्यमापन शास्त्र विभागाने राज्यातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र नाशिकमध्ये उभारले आहे.

Maharashtra Times 20 May 2017, 3:45 am
नाशिक : मापात पाप करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी वैद्यमापन शास्त्र विभागाने राज्यातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र नाशिकमध्ये उभारले आहे. यामध्ये वजन मापातील कायदे सहज समजेल यावर भर दिला असून त्यात फोटो व चित्राचा वापर केला आहे. ग्राहकांची कशी फसवणूक होते याच्या प्रबोधनावर भर देण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम consumer helping centre
मापात पाप करणाऱ्यांना चाप


नाशिक येथील वैद्यमापन शास्त्र अधिकारी जयंत राजदरकर यांच्या कल्पनेतून चार दालनांमध्ये हे प्रबोधन केंद्र उभारले गेले आहे. दालनाला महिंद्रा अॅण्ड महिंदा व सीएट कंपनीने आर्थिक सहाय्य केले आहे. दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत वैद्यमापन शास्त्राच्या सी - १ बिल्डींगमध्ये हे दालन आता सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. शाळा-कॉलेजेसला विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा करता येऊ शकतो. त्यासाठी वैद्यमापन विभागही प्रयत्न करणार आहे. तसेच प्रत्येक ग्राहकाने ते आवश्यक बघितल्यानंतर त्यातून त्यांची वजनाबाबतीत फसवणूक होणार नाही, असेच हे दालन आहे.

वजनाची इत्यंभूत माहिती

वजनकाटेबाबत असलेल्या नियमाबाबत सामान्यांना फारशी माहिती नसते. त्यात फसवणूक होऊनही बऱ्याचदा त्याची तक्रार कोठे करायची याची माहिती नसते. या प्रबोधन केंद्रातील पहिले दालन काय करावे व काय करू नये ही संकल्पना समोर ठेऊन तयार केले आहे. यात दुकानात गेल्यानंतर ग्राहकाने काय दक्षता घ्यावी, याची माहिती दिली आहे. यात इंधन पंपावरील होणाऱ्या फसवणुकीसह गॅस सिलिंडरची माहिती येथे देण्यात आली आहे. सिलिंडरच्या वजनात कसा घोळ केला जातो, त्यासाठी काय तपासणी करावी, याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या दालनात वैध, अवैध वजने मापे व उपकरणे याची माहिती देण्यात आली आहे.

कायदे अन् नियमांविषयी

तिसऱ्या दालनात वैध व अवैध अशी दोन दुकाने समोरासमोर उभारण्यात आले असून त्यात १० गोष्टी चित्ररुपाने मांडण्यात आल्या आहेत. यात वैध दुकानात काय असते व अवैध दुकानात काय नसते याची माहिती आहे. पडताळणी प्रमाणपत्र प्रदर्शित करणे, वजन काटे पडताळणी झाली आहे का हे कसे बघणे, सिलबंद उत्पादनात नाव, पत्ता, उत्पादनाची तारीख, यासह काय गोष्टी बघाव्या याचे वर्णन केले आहे. चौथ्या दालनात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ ची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

ग्राहकांना सहज वैद्यमापन कायदा समजावा, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हे प्रबोधन केंद्र तयार केले आहे. भेट दिल्यावर ग्राहकांना माहिती मिळू शकेल. केंद्र सर्वांसाठी खुले आहे.
- जयंत राजदरकर, वैद्यमापन शास्त्र अधिकारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज