अ‍ॅपशहर

सव्वा लाख लोकसंख्येमागे ३३ टक्के व्यसनी!

मौखिक आरोग्य तपासणीअंतर्गत पहिल्या ९ दिवसांत जिल्हाभरातील एक लाख २७ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ३३ टक्के व्यक्तींना तंबाखूसह मद्याचे व्यसन असल्याचे समोर आले असून, कॅन्सर आजाराची लक्षणे असू शकतील, अशा ७५१ नागरिकांसाठी पुढील तपासणी हाती घेण्यात आली आहे.

अरविंद जाधव | Maharashtra Times 12 Dec 2017, 4:00 am
नाशिक : मौखिक आरोग्य तपासणीअंतर्गत पहिल्या ९ दिवसांत जिल्हाभरातील एक लाख २७ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ३३ टक्के व्यक्तींना तंबाखूसह मद्याचे व्यसन असल्याचे समोर आले असून, कॅन्सर आजाराची लक्षणे असू शकतील, अशा ७५१ नागरिकांसाठी पुढील तपासणी हाती घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम diseases of addiction in survey of nashik
सव्वा लाख लोकसंख्येमागे ३३ टक्के व्यसनी!


जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुखस्वास्थ्य तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान राज्यातील ३० वर्षांवरील सुमारे सव्वा कोटी लोकांच्या मौखिक आरोग्यासाठी तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. मुखस्वास्थ्य जीवनाचे गमक आहे. भारतात मुख कर्करोग हा प्राधान्याने आढळून येतो. पूर्वावस्थेत मुख कर्करोग ओळखला गेला तर त्यापासून वाचता येते. तंबाखूसह गुटखा, मशेरी सेवन ही कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. मुख कर्करोगाला आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच ३० वर्षांवरील व्यक्तींची मुखस्वास्थ्य तपासणी महत्त्वाची ठरते. या मोहिमेंतर्गत पहिल्या नऊ दिवसांत जिल्हाभरात एक लाख २७ हजार १९ नागरिकांची मौखिक तपासणी करण्यात आली. सरकारी हॉस्पिटल्ससह आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. यात मद्याचे व्यसन असलेल्या १४ हजार २११ आणि तंबाखूचे व्यसन असलेल्या २८ हजार २८८ व्यक्ती आढळून आल्या आहेत. तपासणी झालेल्या एकूण व्यक्तींच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे ११ आणि २२ टक्के ठरते. दरम्यान, तोंडात चट्टा असणे, जखम लवकर न भरणे, जखमा असलेल्या ७५१ नागरिकांना आरोग्य विभागाने पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पाठवले आहे. मुख कॅन्सर होण्याची सुरुवात अशाच पद्धतीची असते. ७५१ पैकी काही व्यक्ती अशा आढळून आल्या तर त्यांना वेळीच उपचार मिळू शकतो. राज्य पातळीवरील हा महत्त्वाचा उपक्रम असून, यात खासगी संस्थांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.

मौखिक आरोग्य व्यवस्थित असणे ही महत्त्वाची बाब असून, सरकारच्या निर्देशानुसार तपासणी मोहीम सुरू आहे. तंबाखू, गुटखा यांसारख्या व्यसनांमुळे कॅन्सरसारख्या आजारास खतपाणी मिळते. या मोहिमेंतर्गत उपचारासह जनजागृतीवरदेखील भर दिला जातो आहे.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज