म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
गेल्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी भगूरजवळील दोनवाडे येथे चार वर्षीय बालकावर हल्ला करून मृत्यू झाला होता. याच दोनवाडे गावात सोमवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास मळ्यातील घरात झोपलेले जीवराम गोविंद ठुबे (वय ७६) यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री ११ ते पहाटे ५ च्या दरम्यान ही घटना घडली. बिबट्याने घरापासून त्यांना शेजारील नाल्यापर्यंत ओढत नेले. सकाळी आठच्या सुमारास ठुबे यांचा नातू सागर आजोबांना चहा घेऊन आला होता. घरात आजोबा नव्हते, मात्र उंबरठ्यावर रक्त आढळले. त्याने गावातील घरी येऊन वडील दत्तू ठुबे यांना माहिती दिली. दत्तू ठुबे यांच्यासह जवळपासच्या काही नागरिकांनी मळ्यात जाऊन पहिले असता घरात पडलेले रक्त पाहून शेजारील नाल्याकडे धाव घेतली. तेथे जीवराम ठुबे मृतावस्थेत आढळले. पोलिसपाटील संपत वाघ यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन व वन विभागाला तत्काळ या घटनेची माहिती दिली. दरम्यान, वन विभागाच्या वतीने एक पिंजरा या भागात लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आहे.