अ‍ॅपशहर

अर्धशतकी परंपरा खंडित!

नाशिकरोड मनपा कार्यालय यंदा गणेशोत्सवाला मुकणार म टा...

Maharashtra Times 12 Sep 2018, 4:00 am

नाशिकरोड मनपा कार्यालय यंदा गणेशोत्सवाला मुकणार

..

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड महापालिका कार्यालयाची ५० वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा यंदा खंडित झाली आहे. नाशिकरोडचा मानाचा हा पहिला गणपती यंदा दिसणार नाही. कर्मचारी सूत्रांनी सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे यांची थेट परवानगी नसल्याने यंदा सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही.

नाशिकरोड विभागीय कार्यालयात सुमारे साडेचारशे कर्मचारी-अधिकारी आहेत. त्यांचे नाशिकरोड अधिकारी कर्मचारी गणेश मंडळ आहे. सन १९६५ च्या सुमारास नाशिकरोड-देवळाली नगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून पालिका कर्मचारी गणेशोत्सव साजरा करतात. नाशिकरोडचा हा मानाचा पहिला गणपती आहे. विसर्जनाच्या दिवशी या गणेशापुढे नारळ वाढविल्यानंतरच मिरवणुकीला प्रारंभ होतो. महापालिकेच्या आवारात मोठा मंडप टाकून प्रबोधनपर देखावा मंडळ सादर करते. उत्सवासाठी नेते किंवा मनपाकडून रुपयाही न घेता उत्सव साजरा केला जातो. महापालिकेला जागेचे भाडेही दिले जाते.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका कार्यालयात देवदेवतांच्या प्रतिमा लावण्यास प्रतिबंध केला आहे. त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा महापालिकेचा हा पहिला गणेशोत्सव आहे. पालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालय, सिडको आणि नाशिकरोड विभागीय कार्यालयात असा उत्सव साजरा होतो. यंदा आयुक्तांचे प्रतिबंधांचे पत्र नसले तरी थेट परवानगीही नसल्याने नाशिकरोडच्या कर्मचाऱ्यांनी उत्सवासाठी पुढाकारच घेतला नाही. यंदा गणेश प्रतिष्ठापना करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

...

मानाचा गणपती

पालिका कर्मचारी अर्धशतकाहून अधिक काळ गणेशोत्सव साजरा करीत आले आहेत. नाशिकरोडला सत्कार पॉईंट येथे नगरपालिकेचे पहिले कार्यालय होते. तेव्हापासून कर्मचारी गणेशोत्सव साजरा करतात. हे कार्यालय नंतर देवीचौकात आणि आता पाच वर्षांपूर्वी दुर्गादेवी मंदिराशेजारी भव्य इमारत कार्यालयात स्थलांतरीत झाले. तेथेही गणेशोत्सव परंपरा सुरू होती.

...

प्रबोधन अन् बक्षिसे

प्रबोधनपर आणि भव्य देखाव्यासाठी हे मंडळ पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मंडळाने मोरुची मावशी या नाटकाचा प्रयोग केला होता. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम मंडळ आयोजित करते. मंडळाच्या नशाबंदी देखाव्याला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. बेटी बचाओ, अंधश्रद्धा निर्मूलन, लोकसंख्यावाढ आदी विषयांवर मंडळाने देखावे सादर केले. संत तुकारामांचे वैकुंठगमन, शिव आराधना, नागकन्या, शिवरायांचा आठवावा प्रताप, संत मीराबाई हे अलिकडचे भव्य देखावे आहेत. यंदा मंडळाचा गणेशोत्सव नसल्याने भाविक आणि कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज