म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
डांबरात भेसळ करणाऱ्या पाच संशयित आरोपींना पंचवटी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जवळपास २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मुंबई आग्रा हायवेवरील राधाकृष्ण हॉटेलजवळील प्रीमियम मार्केटलगत असलेल्या इंडियन रोड कॅरिअरच्या पाठीमागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
मयूर वसंत सोनवणे उर्फ महाजन (३४, रा. अमरधामरोड, पंचवटी), आप्पा तुकाराम चव्हाण (२४, चालक, रा. भडगाव, जिल्हा जळगाव), गब्बरसिंग राठोड (४६, टोकमगड, उत्तरप्रदेश), शिरताजअली शौकतअली (२५, रा. खरगपूर, उत्तरप्रदेश), जमशेदअली वारीसअली (२२, खरगपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. डांबरात भेसळ करून फसवणुकीचा उद्योग सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार तांबे यांनी कारवाई करण्याचे आदेश पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांना दिले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवार पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकाला सोबत घेत त्यांनी आडगाव हद्दीतील वरील ठिकाणी कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून डांबराचे दोन टँकर, एक जनरेटर व्हॅन, टँकरची टाकी, गॅसटाकी, रिकामे ड्रम, मिक्सर बॉयलर, डांबरात मिक्स करण्याची पांढरी पावडर असा तब्बल २८ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.