म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आयोजित सीएम चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या कॅरम, कबड्डी, कुस्ती, खो-खो आणि व्हॉलीबॉल स्पर्धांचे पारितोषिक वितरण आमदार बाळासाहेब सानप आणि भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कबड्डीमध्ये ५४, खो-खो मध्ये ३४, व्हॉलीबॉल मध्ये २३ तर कुस्तीमध्ये १२६ खेळांडूनी सहभाग घेतला. कबड्डीमध्ये पुरुष गटात अनुक्रमे क्रीडा प्रबोधिनी, ब्रह्मा क्लब अ, शिवशक्ती संघ आणि ब्रह्मा क्लब ब या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. खो-खो महिला गटात संस्कृती क्लब, समर्पण क्रीडा मंडळ, श्रीराम विद्यालय आणि मखमलाबाद या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांमध्ये संस्कृती, महाबली बॉइज, क्रांती क्रीडा मंडळ आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी उपांत्य फेरी गाठली. १६ वर्षांआतील मुलींमध्ये उपांत्य सामने खेळवले गेले. यामध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाने एकलव्य संघावर १२ विरुद्ध ८ अशा फरकाने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात टिबरीवाला संघाने श्रीराम विद्यालय संघाचा ९ विरुद्ध ७ असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. व्हॉलीबॉलमध्ये १६ वर्षांआतील मुलींमध्ये र. ज. चौहान शाळेने प्रथम सेक्रेड हार्ट क्लबने दुसरा, तर पंचवटी संघाने तिसरा क्रमांक मिळवला. कॅरम संघामध्ये १ हजार १२० खेळाडूंनी भाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये अंकित तुरेने प्रथम, वैभव शिरसाट याने दुसरा तर आदित्य गर्गे याने तिसरा क्रमांक मिळवला. १६ वर्षे मुलींमध्ये अंतिम लढतीत तनिष्का सोनार हिने हर्षदा केदार हिचा पराभव करुन विजेतेपद मिळविले.