अ‍ॅपशहर

उधारी मागितल्याने विक्रेत्याला मारहाण

फळे उधार मागितली असता ती न दिल्याने तसेच पूर्वीची उधार मागितल्याचा राग आल्याने दोघांनी फळविक्रेत्याला बेदम मारहाण केली.

Maharashtra Times 24 May 2017, 3:22 am
नाशिक : फळे उधार मागितली असता ती न दिल्याने तसेच पूर्वीची उधार मागितल्याचा राग आल्याने दोघांनी फळविक्रेत्याला बेदम मारहाण केली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नवीन आडगाव नाका परिसरातील विजयनगरमध्ये हा प्रकार घडला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fruit seller beaten by youth
उधारी मागितल्याने विक्रेत्याला मारहाण


शिवाजी सजन कोल्हे (३६, रा. त्रिमूर्तीनगर, हिरावाडी रोड) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गणेश दिलीप भवर (२१) आणि संकेत अरुण सानप (दोघेही रा. विजयनगर कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सायंकाळी दोघे कोल्हे यांच्या दुकानावर आले. त्यांनी उधारीत सफरचंदांची मागणी केली. परंतु, त्यांच्याकडे पूर्वीची उधारी बाकी होती. त्यामुळे कोल्हे यांनी फळे देण्यास नकार दिला. तसेच जुन्या उधारीची मागणी केली. याचा राग आल्याने संशयितांनी कोल्हे यांना लाथा बुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण केली. ‘तू तुझे दुकान कसे लावतो, ते बघतो’ अशी धमकी दिली.

मंगळसूत्राची चोरी

मेळा बसस्थानक येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने लांबविले. सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास कांताबाई विनोद सूर्यवंशी (४५, रा. अहमदपूर, जि. लातूर) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी या बसस्थानकावर थांबल्या असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र लांबविले.

६२ हजारांची चोरी

नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील लॅमरोड भागात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने ६२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ‌विद्या जैन (४३, रा. जैन स्थान, विरायतन सोसायटी, लॅमरोड) यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्या बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या घरातील कपाटामधील ६२ हजारांची रोकड चोरून नेली.

आज निषेध मोर्चा

सिन्नर फाटा : सिन्नर फाटा येथील लैंगिक अत्याचार पीडित बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शांतता न्याय मोर्चा समितीच्या वतीने बुधवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता महसूल आयुक्तालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. दुर्गा मंदिर येथून या मोर्चास प्रारंभ होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज