अ‍ॅपशहर

नाशिक - ग्रामसेवक धरणे आंदोलन

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या कार्यपध्दती विरोधात ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पंधरा पंचायत समिती कार्यालयांसमोर सोमवारी सामूहिक रजा टाकून एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

Maharashtra Times 23 Jan 2018, 4:00 am
सीईओंची बदली करण्याबरोबरच विविध मागण्यांचे निवेदन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gramsevak aggitation ahed of panchayat sammitti
नाशिक - ग्रामसेवक धरणे आंदोलन


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या कार्यपध्दती विरोधात ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पंधरा पंचायत समिती कार्यालयांसमोर सोमवारी सामूहिक रजा टाकून एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या अगोदरच ग्रामसेवकांनी १७ जानेवारीपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील १३८१ ग्रामपंचायतीतील १२५० ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आहेत. ते सर्व या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचारी, विस्तार अधिकारी व मुख्य सेविकाही सहभागी झाले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाल्यापासून ग्रामसेवकांचे प्रश्न प्रलंबित ठेवणे, जिल्हास्तरावरून वितरीत होणाऱ्या निधी फाइलवर त्रूटी काढून ती पुन्हा पाठवणे, कोणतीही चौकशी न करता ग्रामसेवकांना निलंबित करणे यासारखे अनेक आरोप करीत ग्रामसेवकांनी हे आंदोलन पुकारले आहे. मीना यांची बदली होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची त्यांची भूमिका आहे. दि. १७पासून असहकार आंदोलन पुकारल्यानंतर २२ रोजी धरणे व आता दि. २९ जानेवारीला जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले जाणार आहे. त्यानंतर ५ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त कार्यालयासमोरही आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनात कंत्राटी ग्रामसेवक सेवा नियमित करणे, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती करणे, निलंबित ग्रामसेवक, अधिकारी यांना पुनर्स्थापित करणे, ग्रामसेवक संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना स्थायीत्व मंजूर करणे यासारख्या तब्बल १४ मागण्या मांडून निवेदन देण्यात आले.

नाशिक तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नाशिक तालुक्यातील ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तालुकाध्यक्ष बळीराम पगार, सचिव सुभाष गायकवाड यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले. नाशिकबरोबरच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व पंचायत समितीवर हे निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांसमोर सोमवारी ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, मुख्य सेविका हे सुध्दा सहभागी झाले. विविध मागण्या व जिल्हा परिषदेच्या सीईओच्या कार्यपध्दतीविरोधात हे धरणे आंदोलन करण्यात आले.

- कैलासचंद्र वाघचौरे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज