अ‍ॅपशहर

राज्यभरात माळढोकचे सर्वेक्षण

नाशिक : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकचे (ग्रेट इंडियन बस्टर्ड) राज्यभरात सर्वेक्षण केले जाणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला असून, डेहराडूनच्या वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

भावेश ब्राह्मणकर | Maharashtra Times 10 Sep 2017, 4:44 am
नाशिक : नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकचे (ग्रेट इंडियन बस्टर्ड) राज्यभरात सर्वेक्षण केले जाणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला असून, डेहराडूनच्या वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम great indian busterd survey
राज्यभरात माळढोकचे सर्वेक्षण


शेतकऱ्यांचा मित्र आणि देखणा प्राणी म्हणून ओळख असलेल्या माळढोक पक्षाची संख्या नगण्य झाली आहे. आवश्यक कुरण नष्ट होणे, भक्ष्य न मिळणे तसेच मानवी हस्तक्षेप होणे यामुळे माळढोक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन सोसायटीने (आययूसीएन) जाहीर केले. त्यामुळेच माळढोकचा समावेश लालयादीत करण्यात आला. या पक्ष्याचे भारतातील अस्तित्व रहावे, त्यात वाढ व्हावी यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने एका विशेष कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार माळढोक संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले. नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर येथील माळढोकचा अधिवास पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. राज्याचा वनविभाग आणि डेहराडूनच्या वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यूएलआयआय) यांच्यावतीने आता माळढोकच्या सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. येत्या २५ सप्टेंबरपासून हे सर्वेक्षण होणार असून, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. १५ चौरस किलोमीटर अंतर असलेला एक भाग अशा एकूण २८० भागांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचे नियोजन डब्ल्यूएलआयआयने केले आहे. राज्यभरात ६० हजाराहून अधिक चौरस किलोमीटर क्षेत्रात हे सर्वेक्षण होणार आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक पातळीवर राज्यात प्रथमच असे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली. या सर्वेक्षणासाठी काही स्वयंसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे.

ओझरखेड आणि माळढोक

नाशिक, निफाड आणि दिंडोरी या तीन तालुक्यांशी संबंधित असलेल्या ओझरखेड धरणाच्या परिसरात २००७च्या सुमारास माळढोक दिसल्याच्या नोंदी आहेत. नाशिक जिल्ह्यातील माळढोकच्या स्पॉटिंगचा (अस्तित्त्व) अहवाल तत्कालीन उपवनसंरक्षक अरविंद पाटील यांनी वनविभागाला सादर केला होता. त्यानंतर केंद्राच्या योजनेनुसार माळढोकसाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार ओझरखेड धरण परिसरातील ५०० एकरची जागा विशेष संरक्षित करण्यात आली. त्यासाठी या भागाला कुंपण करण्यात आले. तेथील गवती कुरण टिकविणे, त्यात वाढ करणे, नियंत्रित वातावरण तयार करणे, अंडी राखण आणि उबवण केंद्र स्थापन करणे ही कामे करण्यात आली आहेत.

एचएएलमुळे धोका

ओझरखेड धरण परिसरात ओझर येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा लढाऊ विमाने तयार करण्याचा प्रकल्प आहे. या विमानांच्या निर्मितीत विविध चाचण्या घ्यावा लागतात. त्यासाठीच या परिसरात एअरस्ट्रीप (हवाई उड्डाण कार्यक्षेत्र) निश्चित करण्यात आली आहे. माळढोकच्या परिसरातील ही एअर स्ट्रीपच त्यांचे अस्तित्व नष्ट करणारी असल्याचा अहवाल नाशिक वनविभागाने तयार केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज