अ‍ॅपशहर

उपचार नाकारल्याने जखमी पोलिसाची परवड

अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रामाणिक पोलिसावर मोठ्या हॉस्पिटल्सनेच उपचार नाकारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका सुसज्ज हॉस्पिटलने तर अॅम्बुलन्स पाठवली आणि नंतर फोन करून सांगितले, की आम्ही उपचार करू शकणार नाही! तर एका हॉस्पिटलने आधी पैसे भरा मग उपचार करू असा पवित्रा घेतला. एकूणच या संपूर्ण घटनाक्रमात एका प्रामाणिक पोलिसाची गंभीर जखमी अवस्थेत परवड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

अरविंद जाधव | Maharashtra Times 11 Sep 2017, 4:00 am
नाशिक : अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रामाणिक पोलिसावर मोठ्या हॉस्पिटल्सनेच उपचार नाकारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका सुसज्ज हॉस्पिटलने तर अॅम्बुलन्स पाठवली आणि नंतर फोन करून सांगितले, की आम्ही उपचार करू शकणार नाही! तर एका हॉस्पिटलने आधी पैसे भरा मग उपचार करू असा पवित्रा घेतला. एकूणच या संपूर्ण घटनाक्रमात एका प्रामाणिक पोलिसाची गंभीर जखमी अवस्थेत परवड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोपट पवार असे या दुर्दैवी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hospitals rejected the treatment of injured policemen
उपचार नाकारल्याने जखमी पोलिसाची परवड


शहर वाहतूक शाखेतील प्रामाणिक व मनमिळावू कर्मचारी म्हणून पोपट पवार यांची ओळख आहे. आर्थिक स्थिती बेताचीच. दोन दिवसांपूर्वी पवारांची साप्ताहिक सुटी होती. दुचाकीवर घराबाहेर पडलेल्या पवारांचा बिटको परिसरात अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या पोलिसांनी त्यांना व्हॅनमधून नजीकच्या जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वरिष्ठांना ही माहिती समजली. त्यांनी पोलिस दलाशी टायअप असलेल्या सुसज्ज हॉस्पिटलशी उपचारासाठी संवाद साधला. या हॉस्पिटलने तातडीने रुग्णवाहिका पाठवली. पवार यांना जयराम हॉस्पिटलमधून संबंधित हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी ऐनवेळी उपचार करण्यास नकार दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतरही हॉस्पिटल प्रशासनाने नकार दिला. पोलिस योजनेऐवजी रोख पैसे घेऊन उपचार करा, अशीही विनंती या हॉस्पिटल प्रशासनाकडे करण्यात आली. तरीही डॉक्टरांची नकारघंटा कायम होती. अखेर हतबल पोलिसांनी जखमी अवस्थेतील निपचित पडलेल्या पवार यांना घेऊन शहरातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणले. येथेही पवारांची परवड थांबली नाही. एकेक हॉस्पिटल उपचार नाकारत होते. काही ठिकाणी अवाजवी पैशांची मागणी करण्यात आली, तर काही ठिकाणी जागा शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. अखेर पंचवटीतील एका हॉस्पिटलमध्ये पवारांना प्रवेश मिळाला. मात्र, तोपर्यंत ‘गोल्डन हवर्स’ निघून गेला होता. आता पवारांची जीवन-मृत्यूशी झुंज सुरू आहे.

पोलिसांना उपचार देण्याची बांधिलकी असलेल्या हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार का दिला? अपघातानंतर पोलिसाची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय? वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी फोन करूनही पवारांसाठी न्यूरो सर्जन वेळेत का उपलब्ध झाला नाही, अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ सध्या तीन हजार पोलिसांच्या डोक्यात घोघांवते आहे.

पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला धक्का

पोलिस कर्मचारी पोपट पवार आदिवासी परिवारातील असून, त्यांच्या कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. पवार यांचा मोठा मुलगा कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगा शाळेत जातो. घरातील कर्त्या पुरुषावर आलेल्या या संकटाने पवार यांच्या पत्नीला काहीच कळेनासे झाले आहे. त्यांच्या या अवस्थेने वरिष्ठ अधिकारीही हेलावले. आर्थिक विवंचना पवार कुटुंबासमोर आ वासून उभी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज