अ‍ॅपशहर

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

कोल्हापूरमधील शिक्षण संस्थेमध्ये ‌विविध पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीला येण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रसिद्ध करून आलेल्या हजारो इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी १०० ते २०० रुपये उकळण्याचा प्रकार सिडको परिसरात सोमवारी उघडकीस आला. काही जागरुक तरुणांनी या प्रकाराविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, फसवणूक झालेल्या तरुणांनी अंबड पोलिस स्टेशनबाहेर दुपारी उशिरापर्यंत गर्दी करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

Maharashtra Times 24 May 2016, 4:03 am
कोल्हापूरमधील शिक्षण संस्थेमध्ये ‌विविध पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीला येण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रसिद्ध करून आलेल्या हजारो इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी १०० ते २०० रुपये उकळण्याचा प्रकार सिडको परिसरात सोमवारी उघडकीस आला. काही जागरुक तरुणांनी या प्रकाराविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, फसवणूक झालेल्या तरुणांनी अंबड पोलिस स्टेशनबाहेर दुपारी उशिरापर्यंत गर्दी करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम job advt cidco crime
नोकरीच्या आमिषाने फसवणूक


दोन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात कोल्हापूर येथील महर्षी शाहू राजे शिक्षण संस्थेच्या नावाने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यात संस्थेला प्राथमिक उपशिक्षक, माध्यमिक उपशिक्षक, क्रीडा शिक्षक, चित्रकला उपशिक्षक, लिपिक, शिपाई यासारखे अनेक पदे भरावयाची असून थेट मुलाखतीला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी नाशिकबरोबरच धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यातील हजारो इच्छूक उमेदवार महाराणा राणाप्रताप चौकातील या संस्थेच्या कार्यालयाजवळ हजर झाले. यावेळी सुरुवातीला संस्थेकडून प्रत्येकाकडून १०० रुपये घेवून त्यांना एका फॉर्मचे वाटप करण्यात आले. हा फॉर्म भरून दिल्यानंतर मुलाखत घेतल्याचे खोटे दर्शविण्यात आले. मात्र, हा सर्व प्रकार खोटा असल्याचा संशय काही जणांना आला. त्यांनी संस्थेची माहिती विचारण्यात सुरुवात केली. मात्र, संस्थेच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे उपस्थितांचा संशय बळावला. अखेरीस यातील काही जणांनी थेट अंबड पोलिस ठाण्यात नोकरीच्या नावाने तरुणांची फसवणूक केली जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संस्थेच्या तेजल गोसावी, तुषार गोसावी, हेमंत वेलीस यांच्यासह अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेतले. यानंतर सर्व इच्छुक उमेदवारही अंबड पोलिस स्टेशनला जमा झाले.

यावेळी पोलिस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची तसेच मुलाखतीच्या नावाखाली घेतलेले पैसे परत मिळावे, अशी मागणी तरुणांनी केली.

सुरुवातीला १०० रुपयांना देण्यात आलेले फॉर्म नंतर २०० रुपयांना विकण्यात आले. त्यामुळे ही निव्वळ फसवणूकच असल्याचे लक्षात येते. मुलाखतीला बोलावून त्यानंतर फॉर्म भरून घेण्याची कोणती पद्धत आहे? - अशोक पाडवी

वृत्तपत्रात आलेली जाहिरात वाचून नोकरीच्या आशेने आलो. परंतु, त्या ठिकाणी आमचे कागदपत्र घेऊन मुलाखत न घेता केवळ १०० रुपये घेऊन एक फॉर्म भरून घेतला. हा प्रकार फसवणुकीचा असून केवळ पैसे उकळले जात आहेत. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करून आमचे पैसे व कागदपत्र परत मिळवून द्यावेत. - सोनिया देशमुख

शिक्षण संस्थेत नोकरी मिळेल या हेतूने आम्ही थेट मुलाखतीला आलो. पण या ठिकाणी आल्यावर फॉर्म फी मागण्यात आली. तसेच संस्थेविषयी माहिती विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पोलिसांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी व न्याय मिळवून द्यावा. - सुवर्णा राऊत

महर्षी राजे शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित मुलाखतीप्रसंगी पावती न देता १०० ते २०० रुपये घेण्यात आले. पावती व शाळेबद्दल विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून केवळ फसवणूक करणे हाच यांचा उद्देश असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी व्हावी. - योगेश गांगुर्डे, डीएड-बीएड बेरोजगार संघटना

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज