अ‍ॅपशहर

के.रं.शिरवाडकर निधन (कुसुमाग्रजांचे बंधू)

ज्येष्ठ साहित्यिक केशव शिरवाडकर यांचे निधन म टा खास प्रतिनिधी, नाशिक ज्येष्ठ साहित्यिक डॉ...

Maharashtra Times 27 Mar 2018, 5:00 am

ज्येष्ठ साहित्यिक केशव

शिरवाडकर यांचे निधन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. केशव रंगनाथ शिरवाडकर यांचे पुणे, कोथरूड येथील घरी हृदयविकारामुळे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे ते कनिष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे आहेत. कन्या परदेशातून येणार असल्याने त्यांच्यावर बुधवारी (दि. २८) अंत्यसंस्कार होणार आहेत.

केशव शिरवाडकर यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. ते एम. ए. (इंग्लिश) पीएच. डी होते. नांदेडला पीपल्स कॉलेजचे ते प्राचार्य तर पुणे विद्यापीठात इंग्रजी विभागात त्यांनी प्राध्यापक पदावर काम केले होते. 'रंगविश्वातील रसयात्रा : शेक्सपिअर साहित्य आणि जीवन', 'मार्क्सवादी साहित्यविचार' आणि 'साहित्यवेध' ही त्यांची तीन पुस्तके प्रकाशित आहेत. यापैकी पहिल्या दोन पुस्तकांना राज्य सरकारचे परस्कार मिळालेले आहेत. तर तिसऱ्या पुस्तकाला प्रा. रा. श्री. जोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'इंडियन नॉव्हेल इन इंग्लिश अॅण्ड सोशल चेंज', 'एसे ऑन कम्पारेटिव्ह लिटरेचर अॅण्ड लिंग्युस्टीक' ही दोन इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे कुसुमाग्रजांनी कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा केशव शिरवाडकर यांचे नाव पुढे लावून 'केशवाग्रज' या टोपणनावाने ते कविता लिहित असत. कालांतराने त्यांनी 'कुसुमाग्रज' हे नामाभिधान घेतले. कुसुमाग्रज यांच्या समग्र साहित्यावरील परिचय-परामर्शात्मक ग्रंथ डॉ. शिरवाडकर यांनी 'तो प्रवास सुंदर होता' या शीर्षकाने लिहिला. केशव शिरवाडकर हे उत्तम समीक्षकही होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज