म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिकचा मधल्या फळीतील फलंदाज कुणाल कोठावदे याची महाराष्ट्रातर्फे २३ वर्षांखालील संघासाठी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे आयोजित एकदिवसीय मर्यादित षटकांच्या स्पर्धेत कुणाल प्रतिनिधित्व करणार आहे.
या स्पर्धेचे सामने उद्या (३१ ऑक्टोबर) पासून १३ नोव्हेंबरपर्यंत मैसूर येथे होणार आहेत. बडोदा, कर्नाटका, तामिळनाडू, विदर्भ, पंजाब, जम्मू-काश्मीर व गुजरात संघांशी महाराष्ट्राचे सामने होणार आहेत. नाशिक जिल्हा क्रिकेट संघातर्फे तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या कुणालने गेल्या वर्षीदेखील बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो ऑफ स्पिन गोलंदाजीदेखील करतो. या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात आनंदाचे वातावरण आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कुणालला मार्गदर्शन मिळत आहे.