अ‍ॅपशहर

कोंडीच्या फेऱ्यात अडकले भाविक

दोन वर्षांनंतर निर्बंध हटल्यावर यंदाच्या श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरनगरीत भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 15 Aug 2022, 1:31 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रतिनिधी फोटो


दोन वर्षांनंतर निर्बंध हटल्यावर यंदाच्या श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरनगरीत भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. तरुणाईसह सहकुटुंब भाविकांची संख्याही अधिक आहे. परिणामी रविवारी खासगी वाहनांची मोठी गर्दी त्र्यंबकरोडवर होऊन भाविक वाहतूक कोंडीच्या फेऱ्यात अडकले होते.

त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना प्रवेश नसल्याने महिरावणीपासून पुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व पार्किंग फुल्ल झाल्याने पंधरा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. ग्रामीण पोलिसांनी दीड हजारावर मनुष्यबळ बंदोबस्ताकरिता नेमले आहे. शहर पोलिसांनी रविवारी दुपारपासूनच मेळा स्थानकाजवळील वाहतूक नियोजन केले. मात्र, भाविकांचा उत्साह आणि गर्दीपुढे पोलिसांचे नियोजन फोल ठरले. त्र्यंबकेश्वरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात खासगी वाहने दाखल झाली. त्यामुळे त्र्यंबकेश्वर ते तळेगावपर्यंतचे सहा महत्त्वाचे पार्किंग स्पॉट फुल्ल झाले. परिणामी, पोलिसांनी तळेगाव आणि महिरावणी भागात वाहने पार्किंग करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे बसच्या रांगा लावून खासगी वाहनांतील भाविकांना त्यातून त्र्यंबकमध्ये नेण्यात आले. त्यामुळे सातपूर परिसरापर्यंत वाहतुकीवर ताण आला.

--

'सीबीएस'ला रात्री बॅरिकेडिंग

दुपारी दोन वाजेपासून सीबीएस येथील मेळा स्थानकावरून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बस सोडण्यात आल्या. या ठिकाणी सायंकाळी साडेसातनंतर भाविकांचा ओघ प्रचंड वाढला. भाविकांचे जथे स्थानकाकडे येत असल्याने पोलिसांनी बॅरिकेडिंग केले. पण, यावेळी वाहतूक पोलिस नसल्याने खासगी वाहनेही स्थानकाकडे गेली. त्यामुळे बस स्थानकाबाहेर निघताना अडचणी आल्या.

--

त्र्यंबकेश्वरकडे खासगी वाहनांना जाण्यास मज्जाव आहे. त्यामुळे तळेगावपर्यंत पार्किंग करण्यात आली. खासगी वाहनांनी हजारो भाविक दाखल झाले. परिणामी सर्व पार्किंग फुल्ल झाल्या. वाहतूक विभागाची गस्त सुरू ठेवली आहे.

-देवीदास ढुमणे, पोलिस निरीक्षक, वाहतूक ग्रामीण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज