अ‍ॅपशहर

महाराष्ट्रातील 'या' गावात लग्नच होत नाहीत, झाली तर टीकत नाही; वाचा काय आहे कारण?

महाराष्ट्रात एक असं गाव आहे तिथे सुखी वैवाहिक जीवन स्वप्नापुरतचं राहिलं आहे. कारण, या गावातील तरुणांना कोणी मुली देण्यासाठी तयार नाहीत. बरं जरी लग्न झालं तरी दोनच दिवसांत तरुणी पळून गेल्याच्या घटना इथे घडल्या आहेत.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2022, 5:49 pm
नाशिक : महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथं तरुण मुलांची लग्नच होत नाही. बरं झाली तरी काही दिवसांतच मुली पळून घेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याचं कारणही भयंकर आहे. नाशिकपासून जवळजवळ ९० किमी लांब सुरगना तालुका येतो. इथं दांडीची बारी नावाचं गाव आहे. संपूर्ण गावाचा विचार केला तर इथं ३०० लोक राहत असतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marriage
marriage


सुखी वैवाहिक जीवन हे गावातील तरुणांसाठी एक स्वप्नच झालं आहे. कारण एकतर गावाचं नाव ऐकून कोणी मुली देत नाही आणि जरी लग्न झालं तरी काही दिवसांनी मुली पळून जातात. कारण म्हणजे परिसरातील पाण्याची टंचाई. या गावात एका हंडाभर पाण्यासाठी महिलांना अनेक किलोमीटर पायपीट करून कोरड्या स्रोतातून पाणी आणावं लागतं. पाण्याच्या याच भीषणतेमुळे गावातील तरुणांसमोर मोठ्या अडचणी आहेत.

'झाडाझाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत, ते आधी उतरवा..', भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा संताप
पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे गावातील महिलांना आणि मुलींना मोठा त्रास सहन करावा लागतो. गावकरी गोविंद वाघमारे यांनी अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या लग्नाची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, '२०१४ मध्ये एका मुलाचे लग्न झाले आणि दुसऱ्या दिवशी वधू तिच्या माहेरच्या घरी परत गेली. कारण, लग्नाच्या दुसर्‍या ती पाणी आणण्यासाठी इतर स्त्रियांच्या मागे डोंगराच्या पायथ्याशी गेली. परंतु जेव्हा तिला हे समजले की ते किती कठीण आहे, तेव्हा ती कळशी (पाण्याचे भांडे) तिथेच सोडून तिच्या माहेरच्या परत घरी गेली.

nashik water crises



दीड किलोमीटर चढायचं त्यातही पाणी भरण्यासाठी धडपड

प्रत्येक उन्हाळ्यात टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कोरड्या ओढ्यातून पाणी आणण्यासाठी मार्च ते जून या काळात दीड किलोमीटर पायपीट करावी लागते. खडकाळ भागात पायी चालत पाण्याच्या स्त्रोतापर्यंत पोहोचण्याची धडपड इथेच संपत नाही तर खडकांच्या पोकळीत पाणी भरण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते. नंबर आल्यावर ती आत जाते, मग वाटीतून पाणी काढते आणि भांडे भरते. पोकळीतील सर्व पाणी आटले की, स्त्रिया ते भरण्याची वाट पाहतात. या महिलांकडे प्रत्येकी दोन भांडी असतात, ती डोक्यावर ठेवून त्या परत खडकांमधून घरी परततात.


दिवसातून दोनदा आणावं लागतं पाणी

हे वाचून तुम्हाला धक्का बसेल की महिलांना दोनदा पाणी आण्यासाठी जावं लागतं. पहिल्यांदा सकाळी ४ वाजता त्या पाण्यासाठी निघतात. संध्याकाळ होईपर्यंत पाणी आणण्याचं त्यांचं काम सुरुच असतं. यात यंदाचा उन्हाळा जीवघेणा आहे. सूर्य आग ओकत असताना पाण्यासाठी या महिला आपला जीव धोक्यात घालतात. इथं तापमानाविषयी बोलायचं झालं तर उन्हाळ्याचे तापमान साधारणपणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.

सूर्यास्तानंतर या महिला पुन्हा एकदा पाण्यासाठी जातात. आपल्या नंबर येण्याची वाट पाहतात. या एका महिलेने सांगितलं की, 'एक कळशी भरण्यासाठी तीन तास लागतात आणि मग रात्रीच्या अंधारात गावाकडे चालत जावं लागतं.'

वन्य प्राण्यांचाही धोका

जगंलातून प्रवास करावा लागत असल्यामुळे महिलांना वन्य प्राण्यांचा धोका असतो. अश्यात त्या मशाल किंवा टॉर्च घेऊन रोज प्रवास करतात. मोठ्या शहरांमध्ये राहत असल्यामुळे एक दिवस पाणी नाही आलं की आपली तारांबळ होते. पण याच दोन घोटाच्या पाण्यासाठी या महिला जीवाचं रान करतात. त्यांचा हा प्रवास काळजाचं पाणी करणारा आहे.

पाणी टंचाईमुळे या गावातील तरुणांना कोणी मुलगी देत नाही. त्यामुळे अनेकांनी गावही सोडलं आहे. इथली कुंटुंब पाण्यामुळे त्रस्त आहेत. या गावात पाण्याचा प्रश्न कधी मिटेल, या एका दिवसाची वाट इथली लोक पाहत आहेत. त्यामुळे सरकारनेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज