अ‍ॅपशहर

मोर्चा नऊ ऑगस्टलाच

मुंबई येथे काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्ट २०१७ रोजची काढण्यात येणार असल्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.

Maharashtra Times 19 Jun 2017, 3:20 am
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maratha kranti morcha at 9 aug
मोर्चा नऊ ऑगस्टलाच


मुंबई येथे काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्ट २०१७ रोजची काढण्यात येणार असल्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी या मोर्च्याच्या नियोजनावर चर्चा केली. या मोर्चासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चासाठी नांदूर येथील रुख्मिणी लॉन्स येथे रविवारी बैठक झाली. यात औरंगाबाद, नगर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, जळगाव आदी जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी नियोजनाविषयी मत व्यक्त केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सूचनांचा विचार केला जाईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाविषयी जो अपप्रचार सुरू आहे तो बंद करण्याची ताकीद देण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चासाठी एकच प्रकारचे बिल्ले, बॅर्नर, शासनाला देण्यात येणारे निवेदन एकच असावे, अशी सूचना औरंगाबादच्या प्रतिनिधींनी केली.

मोर्चा मुंबईला होणार असल्याने यजमान मुंबईकरांना विचारात घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चा झाला पाहिजे, असे मत मुंबईच्या दिलीप जगताप यांनी व्यक्त केले.

मोर्चाला समाजाची नोंदणी करण्यात यावी तसेच जिल्हावार प्रतिनिधींची निवड त्वरित करण्याची सूचना अॅड. राहुल पवार यांनी केली. मागण्या करताना त्या राज्यासाठी कोणत्या आणि केंद्रासाठी कोणत्या याचे विभाजन करावे. ठराविक मागण्यांचा निवेदनात समावेश करावा. मोर्चासाठी राणीचा बाग ते आझाद मैदान असा मार्ग आहे. त्यानुसार रेल्वे आणि महामार्गाच्या वाहतूकीचा विचार करायला हवा. मुंबईत येणे आणि जाणे अडचणीचे होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशा सूचना मांडण्यात आल्या.

आरक्षण मुद्यावर भर

मोर्चात मराठा आरक्षण या विषयावर भर दिला पाहिजे. अॅट्रॉसिटीसारखा विषय हा केंद्राचा विषय असल्यामुळे तो या मोर्चात घेऊ नये. या विषयामुळेच यापूर्वी महाराष्ट्रात प्रतिमोर्चे निघाले आहेत, असेही मुद्दे मांडण्यात आले. तत्पूर्वी, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन महिलांच्या हस्ते झाले. दिव्या महाले या चिमुरडीने मनोगत व्यक्त केले. गणेश कदम यांनी स्वागत केले. करण गायकर यांनी सूत्रसंचालन केले.

हवी विश्वासू समिती

राज्यस्तरीय १५ पदाधिकाऱ्यांची एक समिती असावी, त्यात ५ महसूल विभागातून ही निवड करावी, ही समिती विश्वासू असावी, शासनाकडून फूट पाडण्याचे प्रकार घडत असल्याचे अनभुव आहे, मोर्चांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिला आहे, त्यांच्याही विचार व्हावा, असे अॅड. शिवाजी सहाणे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज