अ‍ॅपशहर

आता सरकारदरबारी ‘मुक्काम’

कांदा पीक जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळून हमीभावाच्या दृष्टीने कायदा करावा यासह जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. २६) येथील प्रांत कार्यालयावर मुक्कामी मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे.

Maharashtra Times 19 Dec 2018, 2:36 am
म. टा. वृत्तसेवा, चांदवड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mla bacchu kadu protest for farmers
आता सरकारदरबारी ‘मुक्काम’


कांदा पीक जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळून हमीभावाच्या दृष्टीने कायदा करावा यासह जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. २६) येथील प्रांत कार्यालयावर मुक्कामी मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत चांदवड तालुका प्रहारच्या वतीने प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर कोसळल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक हताश झाले आहेत. कांदा बाजारात अक्षरश: रुपये किलोने विकला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविषयी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीतूनच गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यातील नैताळे येथील संजय साठे या शेतकऱ्याने कांदा लिलावातून आलेली तुटपुंजी रक्कम थेट पंतप्रधानांना मनिऑर्डरने पाठविली होती. त्यानंतर काल, सोमवारी साठे यांनी मोदींसमोर पत्राद्वारे कांदा उत्पादकांचे दु:ख मांडले आहे. त्यातच आता प्रहार संघटनेचे आक्रमक आमदार बच्चू कडू मुक्कामी आंदोलन करणार आहेत. प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, ज्येष्ठ नेते महेश आव्हाड, प्रमोद कुदळे, दत्तू बोडके, शरद शिंदे, अनिल भडांगे,प्रकाश चव्हाण, गणेश निंबाळकर, कृष्णा जाधव, चंद्रभान गांगुर्डे, नितीन गवळी, जगन काकडे, गणेश खांगळ, राम बोरसे, हरिभाऊ महाजन, सोमनाथ जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या आहेत मागण्या

उन्हाळ कांदा खरेदीसाठी शासनाने हस्तक्षेप करावा, लाल कांद्यास एक हजार रुपये क्विंटल अनुदान द्यावे, चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्याना संपूर्ण कर्जमाफी करून येणाऱ्या हंगामासाठी त्वरित बीनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, मांजरपाडा-पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालव्याचे काम पूर्ण करून येणाऱ्या हंगामात पाणी उपलब्ध करून द्यावे, कांदा पिकासारखेच इतर पिकांसंदर्भात शासनाने धोरण ठरवून न्याय द्यावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येथील बाजार समितीतून मोर्चा काढत प्रशासकीय इमारतीत मुक्कामी मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज